RDSO will examine the passenger route of the metro on Thursday | आरडीएसओ गुरुवारी करणार मेट्रोच्या प्रवासी मार्गाचे परीक्षण
आरडीएसओ गुरुवारी करणार मेट्रोच्या प्रवासी मार्गाचे परीक्षण

ठळक मुद्देप्रकल्पाची पाहणी : २२ ला ‘सीएमआरएस’तर्फे तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्यानागपूरमेट्रो रेल्वे प्रकल्पांतर्गत व्हायाडक्ट मार्गावरील खापरी मेट्रो स्टेशन ते सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन आणि लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन ते सुभाषनगर मेट्रो स्टेशनपर्यंत नागरिकांकरिता लवकरच १९ कि़मी.पर्यंत मेट्रो प्रवासी वाहतूक सेवा सुरू होणार आहे. या अनुषंगाने ‘आरडीएसओ’ची (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) चमू १४ फेब्रुवारीला आणि २२ व २३ फेब्रुवारीला ‘सीएमआरएस’चे (कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टी) अधिकारी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पाहणी करणार आहे.
१४ फेब्रुवारीला आरडीएसओ व्हायाडक्ट मार्गावर मेट्रोची ट्रायल घेऊन सुरक्षेसंबंधित सर्व उपकरणाचे निरीक्षण करेल. ज्यामध्ये सिग्नल, ट्रॅक्शन(विजेचे तार), ट्रॅक इत्यादी बाबींची पाहणी करण्यात येणार आहे. २२ आणि २३ फेब्रुवारीला सीएमआरएस मेट्रोची ट्रायल घेऊन सुरक्षिततेशी संबंधित ब्रेक सिस्टीम, निर्वासन प्रणाली आणि इतर सर्व उपकरणांची तपासणी केली जाईल. मेट्रो कोचेसमध्ये असलेल्या सुरक्षा उपकरणांची तपासणी ‘सीएमआरएस’कडून करण्यात येईल.
उल्लेखनीय आहे की, नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या खापरी, न्यू-एअरपोर्ट आणि साऊथ एअरपोर्ट मेट्रो स्टेशनला याआधी आरडीएसओचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. देशातील अन्य मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या तुलनेत सर्वात कमी वेळात रेल्वे बोर्डाचे प्रमाणपत्र घेण्याकरिता पूर्ण झाले होते. माझी मेट्रो रेल्वेत तीन कोच राहणार असून यात एक ट्रेलर कोच आणि दोन डीएम कोचचा समावेश राहणार आहे. तसेच या मेट्रो रेल्वेत महिलांकरिता एक आरक्षित कोच ठेवण्यात आला असून त्याला ‘नारीशक्ती’ असे नाव देण्यात आले आहे.

Web Title: RDSO will examine the passenger route of the metro on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.