नागपूर कामठी मार्गावरील फार्म हाऊसवर अंमली पदार्थांचे सेवन करत ‘रेव्ह पार्टी’ सुरू असल्याची खळबळजनक बाब समोर आली. यात महिलासंह चार आरोपींना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक पाच, सामाजिक सुरक्षा विभाग व एएचटीयू पथकाने ही कारवाई केली.
रविवारी मध्यरात्री एक वाजतानंतर नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एस फार्म येथे पार्टी सुरू असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे धाड टाकली असता तेथे पार्टी सुरू असल्याचे आढळले. पार्टीत अंमली पदार्थांचे सेवनदेखील सुरू होते. पोलिसांनी सुनिल शंकरलाल अग्रवाल (६१, रामलक्ष्मी कॉलनी, कामठी), गौतम सुशील जैन (५१, रामदासपेठ), निलेश बाबुलाल गडिया (६१, कमल पॅलेस, रामदासपेठ), मितेश मनोहरलाल खक्कर (४८, रामदासपेठ) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी अंमली पदार्थांचे सेवन करताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यासोबत चार महिलादेखील होत्या.
घटनास्थळावरून पोलिसांनी १.३१ ग्रॅम एमडी पावडकर, हुक्का पॉट, रोख ५८ हजार, सहा मोबाईल, दोन कार असा २६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरोधात एनडीपीएस तसेच कोटपा ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपींना नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने, ललिता तोडासे, मनोज घुरडे, विजय यादव, मनोज नेवारे, शैलेश डोबोले, पवन गजभिये, विवेक अडाऊ, अरविंद गेडेकर, गणेश जोगेकर, रोहीत काळे, सुभाष गजभिये, अमन राऊत, सहदेव चिखले, राहुल पाटील, अनुप यादव यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
एमडी कुठून आली?
आरोपी हे सर्व सधन घरातील असून त्यांचे मोठे कॉन्टॅक्ट्स आहेत. त्यांच्याकडे एमडी पावडर कुठून आली व ते नियमितपणे त्याचे सेवन करून नशा करतात का याचा पोलीस तपास करत आहेत.