संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाची नागपुरात सुरुवात; रामदत्त चक्रधर यांच्या उपस्थितीत उद्घाटन
By योगेश पांडे | Updated: May 8, 2023 15:28 IST2023-05-08T15:27:46+5:302023-05-08T15:28:52+5:30
संघाच्या वर्गात येणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाला देश प्रथम, स्वत:प्रती गौरव, प्रामाणिकता, देशभक्ती, अनुशासन आणि स्नेह भावना विकसित करण्याची संधी प्राप्त होते.

संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाची नागपुरात सुरुवात; रामदत्त चक्रधर यांच्या उपस्थितीत उद्घाटन
नागपूर : एकीकडे कर्नाटक विधानसभा निवडणूकांमुळे राजकारण तापले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी तृतीय वर्ष वर्गामध्ये व्यस्त झाले आहेत. डॉ.हेडगेवार स्मृतिमंदिर परिसरातील महर्षि व्यास सभागृहात सोमवारी संघाच्या तृतीय वर्ष वर्गाची सुरुवात झाली. सहसरकार्यवाह रामदत्त चक्रधर यांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडले. यावेळी त्यांनी संघ स्वयंसेवकांना कार्यविस्तारावर भर देण्याचे आवाहन केले.
यावेळी सहसरकार्यवाह सहसरकार्यवाह मुकुंदा सी.आर., अवध प्रांत संघचालक तसेच वर्ग सर्वाधिकारी कृष्णमोहन, कार्यवाह एन.तिप्पी स्वामी, मुख्य शिक्षक ए.सी.प्रभू, सहमुख्यशिक्षक अतुल देशपांडे, बौद्धिक प्रमुख नरेंद्र शर्मा, सहबौद्धिक प्रमुख उदय शेवडे, सेवा प्रमुख शिवलहरी, व्यवस्था प्रमुख भालचंद्र किटकरू, नरेंद्र बोकडे हे प्रामुख्याने उपस्थित होते.
संघाच्या वर्गात येणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाला देश प्रथम, स्वत:प्रती गौरव, प्रामाणिकता, देशभक्ती, अनुशासन आणि स्नेह भावना विकसित करण्याची संधी प्राप्त होते. स्वयंसेवकांनी समाजातील प्रश्नांची चर्चा करणारे होण्याऐवजी समाधान शोधणारे व्हायला हवे. स्वयंसेवकांनी समाजात कार्य करताना अग्रेसर होत नेतृत्व करणारे बनावे लागेल. लवकरच संघ स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत, या पार्श्वभूमीवर संघ शिक्षा वर्गात सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांनी येत्या दिवसांत कार्य विस्तारासंदर्भात आपली भूमिका काय असावी, याबाबत विचार करायला हवा, असे रामदत्त म्हणाले. यंदाच्या संघशिक्षा वर्गात ६८२ तरुण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. तृतीय वर्ष वर्गाचा समारोप १ जून रोजी होणार आहे.
मे २०२२ पासूनचा तिसरा वर्ग
कोरोनाच्या कालावधीत संघाकडून वर्ग घेण्यात आला नव्हता. २०२२ मध्ये मे व नोव्हेंबर असे दोनदा वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. आता परत नियमित पद्धतीने वर्ग आयोजित करण्यात आला असून मे २०२२ ते मे २०२३ मधला हा तिसरा वर्ग आहे. या वर्गात संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत हेदेखील काही दिवस उपस्थित राहतील.