कुडाळात दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन
By Admin | Updated: October 15, 2015 00:58 IST2015-10-15T00:16:51+5:302015-10-15T00:58:36+5:30
रंगीबेरंगी वटवाघूळ, वामन खंड्या, पार्थेनॉस सिल्व्हिया फुलपाखरू यांचा समावेश

कुडाळात दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन
कुडाळात दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन
रंगीबेरंगी वटवाघूळ, वामन खंड्या, पार्थेनॉस सिल्व्हिया फुलपाखरू यांचा समावेश
रजनीकांत कदम ल्ल कुडाळ
कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील तीन प्राध्यापकांनी सिंधुुदुर्गातील काही जंगलांमध्ये अभ्यासदौरा केला. या दौऱ्यामध्ये त्यांना जगात दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या रंगीत वटवाघूळ, पार्थेनॉस सिल्व्हिया प्रजातीचे फुलपाखरू, लहान वामन खंड्या व शॅमेलिआॅन सरडा या चार विभिन्न प्रजातींचा शोध लागला आहे. या प्रजाती प्रथमच सिंधुदुर्गात सापडल्या असल्याने जिल्ह्याच्या वन्यजिवांची जोपासना करण्याची नव्याने गरज निर्माण झाली आहे.
प्राध्यापक डॉ. मंगेश जांबळे, डॉ. योगेश कोळी व प्रा. संजय कांबळे यांनी प्राणिशास्त्र अभ्यास दौऱ्यानिमित्त गेल्या काही महिन्यांत जिल्ह्यातील कुडाळ व सावंतवाडी तालुक्यांतील जंगलांमध्ये अभ्यासदौरा करून आढळणाऱ्या आणि अस्तित्व धोक्यात असणाऱ्या प्राण्यांच्या वेगवेगळ्या चार प्रजातींची नोंद करण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
तसेच किंगफिशर पक्षी प्रजातीतील सर्वांत लहान असणारा वामन खंड्या या पक्ष्याच्या अत्यंत दुर्मीळ प्रजातीचाही या प्राध्यापकांनी शोध लावला. वामन खंड्या हा पक्षी त्यांना जखमी अवस्थेत आढळला होता. त्याच्यावर उपचार करून वन अधिवासात त्याला सोडून देण्यात आले. या पक्ष्याची नोंद सावंतवाडी, कुडाळ येथील जंगलात करण्यात आली आहे. याचबरोबर या प्राध्यापकांच्या टीमने सरडा प्रकारातील शॅमेलिआॅन या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व अस्तित्व धोक्यात आलेल्या प्रजातीची नोंदही सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भागात वारंवार केली. हा नोंद केलेला सरडा विविध रंग बदलतो. तसेच डोक्याची ३६० अंशांत हालचाल करतो. तसेच इतर वैशिष्ट्यांनीही ही प्रजाती परिपूर्ण आहे. एकाचवेळी दोन बाजूंचे, वस्तूचे निरीक्षण करण्याची किमया असलेल्या या सरड्याचीही नोंद करण्यात आली आहे.
प्राध्यापकांना लागलेल्या या जगातील अत्यंत दुर्मीळ प्राणी व पक्ष्यांच्या प्रजातींच्या शोधामुळे तसेच गेल्या महिन्यात तिराळी येथेही मिळालेल्या दुर्मीळ प्राणी व पक्षी यांच्या प्रजातींमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नैसर्गिक अधिवासाची संपन्नता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. येथे आढळणाऱ्या विविध वनस्पती व प्राण्यांच्या प्रजातींचा सखोल अभ्यास होणे काळाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. यापुढेही हा अभ्यास असाच सुरू राहणार असल्याचे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. जी. भास्कर यांनी व्यक्त केले आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधनसंपत्तीबरोबरच प्राणी, पक्षी यांच्या विविध दुर्मीळ प्रजाती आहेत. काही प्रजातींचा अजूनही शोध लागलेला नाही. या प्रजातींचा शोध लागण्यासाठी आम्ही आमच्या परीने योग्य ती मेहनत घेत राहू. मात्र, येथील असलेल्या दुर्मीळ प्रजातींचे संरक्षण होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असे प्रा. डॉ. मंगेश जांबळे यांनी मत व्यक्त केले आहे. (प्रतिनिधी)
पाट येथे आढळले रंगीत वटवाघूळ
हा अभ्यासदौरा करताना त्यांना जगामध्ये दुर्मीळ प्राणी म्हणून नोंद असलेले रंगीत वटवाघूळ पाट येथील राजू म्हसकर यांच्या बागेतील केळीच्या मोठ्या पानाला चिकटलेले आढळले. हे सर्वांत लहान व रंगीत असणारे वटवाघूळ असून, त्याचे वजन ५ ते ७ ग्रॅम, तर लांबी ४ ते ५ सेंटिमीटर एवढी आहे. हे वटवाघूळ सावंतवाडीतील नरेंद्र डोंगर व देवगड तालुक्यातही दिसून आल्याचे डॉ. जांबळे यांनी सांगितले.
राज्यात पहिलीच नोंद असणारे फुलपाखरू
वालावल येथील मुख्य तलावानजीकच्या जंगलामध्ये डॉ. योगेश कोळी यांना फुलपाखराच्या क्लिपर प्रकारातील पार्थेनॉस सिल्व्हिया प्रजातीचे फुलपाखरू सापडले असून, या फुलपाखरू प्रजातीची ही संपूर्ण महाराष्ट्रातील पहिलीच नोंद आहे. हे फुलपाखरू भारतातील काही राज्यांमध्ये जास्त पाऊस, घनदाट जंगल व प्रदूषणविरहित भागात आढळते.