Rapist education director's bail application rejected | शिक्षण संस्थेच्या बलात्कारी संचालकाचा जामिन अर्ज फेटाळला

शिक्षण संस्थेच्या बलात्कारी संचालकाचा जामिन अर्ज फेटाळला

ठळक मुद्देअटक टाळण्याचा प्रयत्न उधळलापोलिसांकडून जागोजागी शोधाशोधहैदराबाद, मुंबई कनेक्शनची तपासणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्वत:च्या शेतातील आउट हाउसमध्ये ठेवलेल्या निराधार महिलेला पैशाचे आमिष दाखवून तिच्या मदतीने तिच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा शिक्षण संस्थेचा संचालक अशोक जयस्वाल (वय ५०) याचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. दरम्यान, जयस्वालने स्वत:सोबतच पीडित मुलीच्या आईला (सहआरोपी महिला) स्वत:सोबत पळवून नेल्याचा संशय असल्याने पोलिसांनी त्याला शोधण्यासाठी ठिकठिकाणी प्रयत्न चालविले आहेत.
आरोपी जयस्वालची एक शिक्षण संस्था असून तो बांधकाम कंत्राटदारीही करायचा. मध्यप्रदेशातील शिवनी येथील रहिवासी असलेल्या महिलेला आरोपी अशोक जयस्वालने स्वत:कडे कामाला ठेवून घेतले होते. महिला, तीची १५ आणि १७ वर्षांची मुलगी तसेच २० वर्षांचा मुलगा जयस्वालच्या शेतातील आउट हाऊसमध्येच राहत होते. महिलेच्या निराधारपणाचा गैरफायदा उचलून जयस्वालने तिच्या लहानसहान गरजा पूर्ण केल्या आणि तिच्या मुलीवर विखारी नजर टाकणे सुरू केले. संधी साधून नराधम जयस्वाल १७ वर्षीय मुलीला स्वत:कडे बोलवित होता. त्याने आॅक्टोबर २०१६ पासून तिचा लैंगिक छळ सुरू केला. महिलेच्या मदतीने त्याने तिला एकदा हैदराबादला नेले आणि तेथे तिला झोपेच्या गोळ्या खाऊ घालून तिच्यावर बलात्कार केला. तिला बदनामीचा तसेच मारण्याचा धाक दाखवून गप्प केले. मुलीने आपल्या आईला हा प्रकार सांगितला. मात्र, तिनेही गप्प राहण्याचा सल्ला दिल्याने निर्ढावलेला जयस्वाल वारंवार पीडित मुलीवर बलात्कार करू लागला. त्यानंतर त्याने आपली विकृत नजर पीडित मुलीच्या लहान बहिणीवर (वय १५) वळवली. तिला कार्यालयात बोलवून तो तिच्यासोबत अश्लिल चाळे करू लागला. हा प्रकार मुलीने एकाला सांगितला. त्याने मदत करण्याच्या नावाखाली तिला भंडाऱ्याला पळवून नेले. तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणात नंदनवन पोलिसांनी पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. संरक्षण समितीच्या सदस्यांकडून १० सप्टेंबरला मुलीची (वय १५)वास्तपूस्त करण्यात आली. तेव्हा तिने आरोपी जयस्वाल आपला नेहमी विनयभंग करतो आणि मोठ्या बहिणीवर बलात्कार करतो, असे सांगितले. त्यानंतर या संतापजनक प्रकरणाचा बोभाटा झाला. नंदनवन पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करताच आरोपी जयस्वाल फरार झाला.
त्याने स्वत:सोबतच मुलीच्या आईलाही पळवून नेले. फरार राहून वकिलाच्या माध्यमातून तो न्यायालयातून अटकपूर्व जामिन मिळवण्याचा प्रयत्न करीत होता. सत्र न्या. आर. आर. पटारे यांच्यासमोर गुरुवारी या अटकपूर्व जामिनावर सुनावणी झाली. सरकारी वकिल आणि नंदनवन पोलिसांनी प्रकरणातील धक्कादायक बाबी ठेवून जयस्वालच्या जामिनाला विरोध केला. दोन्ही बाजू लक्षात घेत न्या. पटारे यांनी आरोपी जयस्वालचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळून लावला.
तेलंगणा, मध्यप्रदेशात शोधाशोध !
आरोपी जयस्वालने त्याला मदत करणारी पीडित मुलीची आई हिलासुद्धा पळवून नेले असावे, असा संशय आहे. गुन्हा दाखल झाल्याच्या काही वेळेनंतर महिलेचा मोबाईल जगनाडे चौकातून स्वीच्ड ऑफ झाला. तो अद्यापही बंद आहे. महिला अत्यंत गरिब आणि निरक्षर आहे. त्यामुळे तिला मोबाईल लोकेशनचे वगैरे ज्ञान नसावे आणि आरोपी जयस्वालने तिला सोबत नेऊन स्वत:च तिचा मोबाईल बंद करून ठेवला असावा, असा संशय आहे. पोलिसांनी महिलेच्या मुळगावी मध्यप्रदेशात जाऊन तिला शोधण्याचे प्रयत्न केले. मात्र, ती आढळली नाही. तो नेहमी हैदराबाद, मुंबईला जायचा. त्यामुळे तिला आरोपीने हैदराबाद किंवा मुंबईला पळवून नेले असावे, असा संशय आहे. तिकडेही पोलीस पथके त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: Rapist education director's bail application rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.