Raped by relative on newly married | नवविवाहितेवर नातेवाईकाचा पाशवी अत्याचार
नवविवाहितेवर नातेवाईकाचा पाशवी अत्याचार

ठळक मुद्देनागपूरच्या कळमना भागातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नवविवाहिता घरात एकटी असल्याचे पाहून तिच्या वृद्ध नातेवाईकाने तिच्यावर पाशवी अत्याचार केला. गुरुवारी, ४ एप्रिलला दुपारी कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टीत ही घटना घडली.
पीडित महिला २८ वर्षांची आहे. तिचा नवरा गतिमंद आहे. अत्यंत गरीब कुटुंबातील या महिलेचे लग्न चारच महिन्यांपूर्वी गतिमंद तरुणासोबत लावून देण्यात आले होते. तो रोजमजुरी करतो. तर, पीडित महिलेची सासू धुणीभांडी करते. ४ एप्रिलला सकाळी नवरा आणि सासू कामावर निघून गेले. दुपारी जेवणाच्या बहाण्याने घरी आलेल्या वृद्धाने ती एकटी असल्याचे पाहून तिच्यावर पाशवी बलात्कार केला. याबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास ठार मारेन, अशी धमकीही दिली. पीडित महिलेने रात्री आपल्या नवऱ्याला हा प्रकार सांगितला. मात्र गतिमंद असल्याने त्याला त्याचे गांभीर्यच कळले नाही. त्यानंतर तिने दुसऱ्या दिवशी सासूला सांगितले. तिनेही गप्प राहण्याचा सल्ला दिला. त्यामुळे तरुणीने आपल्या माहेरच्यांना संपर्क करून बोलवून घेतले. त्यांना ही घटना सांगितल्यानंतर त्यांनी आरोपीला जाब विचारला असता त्याने वाद घातला. त्यामुळे तरुणी तिच्या माहेरच्या नातेवाईकांसोबत मंगळवारी कळमना ठाण्यात पोहचली. तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पुढील तपास सुरू आहे.

 


Web Title: Raped by relative on newly married
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.