नागपुरात मानलेल्या मामाचा चिमुकलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:01 IST2020-07-22T23:59:54+5:302020-07-23T00:01:03+5:30
कपिलनगर परिसरात एका दहा वर्षीय चिमुकलीवर मानलेल्या मामाने अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे.

नागपुरात मानलेल्या मामाचा चिमुकलीवर अत्याचार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कपिलनगर परिसरात एका दहा वर्षीय चिमुकलीवर मानलेल्या मामाने अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी सन्यालनगर निवासी आरोपी सुनील रमेश मोहनकर (३४) याला अटक केली आहे. ही घटना मंगळवारी दुपारच्या दरम्यानची आहे.
पीडित मुलीचे वडील ट्रकचालक असून गेल्या दोन महिन्यांपासून बाहेर आहेत. आरोपी सुनील मोहनकर हा शेजारी राहतो. पीडित मुलगी त्याला मामा म्हणायची. घटनेच्या दिवशी ही मुलगी आरोपीच्या घरी गेली होती. यावेळी त्याचा भाऊ झोपलेला होता. याचा फायदा घेत आरोपीने मुलीवर अत्याचार केला आणि कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर मुलीला वेदना होत असल्याने आईला संशय आला. तिने विचारण्याचा प्रयत्न केला पण धमकीच्या भीतीने मुलीने काही सांगितले नाही. त्यामुळे आईने परिचित दाम्पत्याच्या मदतीने मुलीला हिंमत दिली तेव्हा मुलीने घटनेचा खुलासा केला. सत्यता समोर येताच आईने कपिलनगर पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी सुनील मोहनकरविरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.