नागपुरात बिल्डरकडून विवाहितेवर वारंवार बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 19:55 IST2018-11-01T19:53:51+5:302018-11-01T19:55:05+5:30
भूखंड खरेदीतून झालेल्या ओळखीनंतर एका महिलेशी सलगी साधून एका बिल्डरने तिच्यावर २५ दिवसांत अनेकदा बलात्कार केला. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास तुझ्या मुलांना जीवे ठार मारेन, अशी धमकीही आरोपीने दिली.

नागपुरात बिल्डरकडून विवाहितेवर वारंवार बलात्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भूखंड खरेदीतून झालेल्या ओळखीनंतर एका महिलेशी सलगी साधून एका बिल्डरने तिच्यावर २५ दिवसांत अनेकदा बलात्कार केला. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास तुझ्या मुलांना जीवे ठार मारेन, अशी धमकीही आरोपीने दिली. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. मोहम्मद फारुख शेख हमीद शेख (वय ३५) असे आरोपीचे नाव असून, तो अग्रसेन चौकाजवळ राहतो.
पीडित महिला २८ वर्षांची आहे. आरोपी फारुखकडून महिलेच्या पतीने काही दिवसांपूर्वी भूखंड खरेदी केला होता. त्यातून या दोघांची ओळखी झाली. नेहमी बातचीत होत असल्याने आरोपीने १ आॅक्टोबरला दुपारी १२.३० वाजता त्याने तिला कामठी रोडवर नाका नंबर २ जवळ बोलवले. आपल्या कारमध्ये बसवून त्याने तिला रामटेकच्या एका हॉटेलमध्ये नेले. तेथे तिच्यावर आरोपी फारुखने बलात्कार केला. बदनामीच्या धाकाने महिला गप्प बसल्याचे पाहून आरोपी निर्ढावला. त्याने तिला नंतर मुलांना मारण्याचा धाक दाखवून २५ आॅक्टोबरपर्यंत वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याच्याकडून भविष्यात धोका होऊ शकतो, हे ध्यानात आल्याने महिलेने जरीपटका ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पुढील चौकशी सुरू आहे.