रंगरेजा...आया तेरे दर पर दिवाना...

By Admin | Updated: October 14, 2014 00:59 IST2014-10-14T00:59:23+5:302014-10-14T00:59:23+5:30

जो बंदिशे जमाने की तोड आया हूं। मै तेरे वास्ते दुनिया को छोड आया हूं।। आया तेरे दर पर दिवाना...सुफियानात रसिक रंगले होते. सुफी गायन म्हणजे अल्ला, ईश्वराची इबादत. अकीदतचे फूल,

Rangreja ... came at your rate Diwana ... | रंगरेजा...आया तेरे दर पर दिवाना...

रंगरेजा...आया तेरे दर पर दिवाना...

मैत्री परिवार संस्थेचे आयोजन : स्नेहभावनेची सुफी गायनाची मैफिल ‘सुफियाना’
नागपूर : जो बंदिशे जमाने की तोड आया हूं। मै तेरे वास्ते दुनिया को छोड आया हूं।। आया तेरे दर पर दिवाना...सुफियानात रसिक रंगले होते. सुफी गायन म्हणजे अल्ला, ईश्वराची इबादत. अकीदतचे फूल, पूजेचे वातावरण. ही स्वरांची मैफिल ईश्वराला समर्पित होती. जगातल्या साऱ्याच प्रामाणिक, सच्च्या आणि अस्सल भावनेला समर्पित ही मैफिल होती. त्यामुळेच स्वरांची उत्कटता निर्गुण, निराकार अल्ला, ईश्वराला स्वरांच्या माध्यमातून शोधत होती. ही मैफिल ऐकताना कुणाचे डोळे अलगद मिटले गेले तर कुणी स्वत:चे भान हरपले. याच ईश्वरीय भावनेचा एक कोपरा निखळ मैत्री. अशाच निखळ मैत्रीच्या भावनेला समर्पित ही मैफिल सुफी गायनाची उंची गाठणारी आणि दाद द्यायला भाग पाडणारी होती.
मैत्री परिवार संस्थेच्यावतीने या ‘सुफियाना’ सुफी गायनाच्या मैफिलीचे आयोजन विष्णुजी की रसोई येथे करण्यात आले. कोजागिरीच्या निमित्ताने आयोजित या मैफिलीत स्नेहभाव वृद्धिंगत करण्याचा आणि स्नेह अधिक घट्ट करून समाजासाठी आपले योगदान देण्याचा उद्देश होता. या मैफिलीचे उद्घाटन लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन आणि खासदार विजय दर्डा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. गिरीश गांधी, प्रसिद्ध होमिओपॅथी चिकित्सक डॉ. विलास डांगरे, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुबे प्रामुख्याने उपस्थित होते. मैत्री परिवार संस्थेतर्फे विष्णू मनोहर, संजय नखाते यांनी अतिथींचे स्वागत केले. याप्रसंगी खा. विजय दर्डा यांनी स्नेहभाव वृद्धिंगत करणाऱ्या या मैफिलीचे स्वागत करून उपस्थित सदस्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
मुळात सुफी संगीत हे दर्ग्यातून निर्माण झालेले संगीत. ईश्वराच्या आराधनेसाठी आणि ईश्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी हे संगीत माध्यम आहे. त्यामुळेच या संगीतात कमालीची विलक्षण आर्तता आणि उत्कटता आहे. कुठल्याही संगीताचा भाव जातधर्मविरहितच असतो. त्याप्रमाणेच सुफी संगीतही केवळ मानवी जीवनाच्या उत्थानासाठी आणि जगण्याचे तत्त्वज्ञान सांगण्यासाठीच आहे. या संगीताला पावित्र्याची किनार आहे. याचा प्रत्यय यावेळी सुप्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांच्या समूहात काम करणाऱ्या गायक दिनेश रहाटे आणि प्रताप यांच्या सुफी गायनातून आला. अजमेर शरीफ ख्वाजा निजामुद्दीन चिश्ती, हाजी अली यांच्या प्रार्थनेने ही संगीत मैफिल बहरली.
रसिकांशी संवाद साधत दिनेश आणि प्रताप यांनी ‘ख्वाजा मेरे ख्वाजा दिल मे समाना...’ या गीताने कार्यक्रमाला प्रारंभ केला आणि त्यानंतर सुफी गायनाने ही मैफिल रंगत गेली. यावेळी ‘पिया हाजी अली, आया तेरे दर पे दिवाना..., लगन लागी मन से मन की लगन..., सैयां..., अल मदद मौला..., मोरा पिया घर आया’ आदी गीतांनी रसिकांना दाद द्यायला भाग पाडणारी ही मैफिल होती. याप्रसंगी निर्मात्या, दिग्दर्शक समृद्धी पोरे यांनीही या कार्यक्रमाला भेट दिली. कार्यक्रमात सिंथेसायझरवर पंकज सिंग, लीड गिटार भूषण रहाटे, आॅक्टोपॅड नंदू गोहाणे, तबल्यावर श्रीकांत सूर्यवंशी आणि ढोलकीवर दीपक कांबळे यांनी साथसंगत केली. प्रकाशयोजना सुनील कोंबाले, मंचसज्जा अमित गोरे आणि ध्वनिव्यवस्था स्वप्नील उके यांची होती.
याप्रसंगी मैत्री परिवार संस्थेतर्फे गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तके दान देण्यात आली. कलावंतांचे स्वागत संजय नखाते, सचिन ढोमणे, विक्रम जोशी, अमर शेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे उर्दुमिश्रित निवेदन श्वेता शेलगावकर यांनी केले. कार्यक्रमानंतर सर्वांनीच नाश्ता आणि कोजागरीच्या दुधाचा आस्वाद घेतला. (प्रतिनिधी)

Web Title: Rangreja ... came at your rate Diwana ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.