लोकमत न्यूज नेटवर्कमौदा : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने दोन वर्षापूर्वी मौदा तालुक्यातून गेलेल्या रामटेक-खात-भंडारा या महामार्गाचे रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण केले. अवघ्या दोन वर्षात या रोडच्या काँक्रिटला तडे गेले असून, या तड्यांमुळे चालकांचे त्यांच्या दुचाकी वाहनांवरील नियंत्रण सुटून अपघात होत आहे. अपघात टाळण्यासाठी या मार्गाची तातडीने दुरुस्ती करणे अनिवार्य असताना त्यासाठी लागणार निधी सरकार कधी मंजूर करणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
हा महामार्ग नागपूर व भंडारा या दोन जिल्ह्यांसोबत नागपूर-जबलपूर आणि नागपूर-रायपूर या दोन महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गाला जोडणार असून, प्रशासनाने याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देत २४७क्रमांक दिला आहे. या महामार्गाने दोन महत्त्वाचे महामार्ग जोडल्याने त्यावर वाहनांची वर्दळदेखील वाढली आहे. यात जड वाहनांची संख्या बरीच मोठी आहे. निर्मितीनंतर किमान १५ वर्षे हा मार्ग शाबूत राहावा, अशी अपेक्षा असताना अवघ्या दोन वर्षात त्याच्या काँक्रिटला तडे जायला आणि त्या तड्यांची लांबी, रुंदी व खोली वाढायला सुरुवात झाली आहे.
या तड्यांमुळे दुचाकी वाहनांचे चाक घसरले आणि अपघात होता. रात्रीच्यावेळी वाहनांच्या हेडलाइटच्या प्रकाशझोतात या तड्यांची रुंदी व्यवस्थित दिसत नाही. विशेष म्हणजे, या महामार्गावर विद्युत पथदिवे लावण्यात आलेले नाही. त्यामुळे रोडवरील तडे अपघातास कारणीभूत ठरत असल्याने त्यांची तातडीने दुरुस्ती करणे तसेच या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करणे गरजेचे आहे.
सुविधांचा अभाव
- राज्यातील बहुतांश राष्ट्रीय महामार्गावर विद्युत पथदिवे लावून रात्रीसाठी प्रकाशाची सुविधा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केली आहे. मात्र, रामटेक-भंडारा महामार्ग याला अपवाद ठरला आहे.
- या महामार्गावर विद्युत पथदिवे २ का लावण्यात आले नाही, हे कळायला मार्ग नाही आणि यावर एकही स्थानिक लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही. नियमाप्रमाणे या मार्गावर पथदिव्यांची सुविधा निर्माण करावी अशी मागणी सरपंच माधुरी वैद्य यांच्यासह नागरिकांनी केली आहे.
दर्जावर प्रश्नचिन्हनिर्मितीपासून अवघ्या दोन वर्षात या मार्गाला तडे गेल्याने या कामाच्या दर्जावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. तड्यांमुळे या महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. या अपघातांना आळा घालण्यासाठी वेळीच योग्य उपाययोजना करण्याची प्रशासनाकडे वारंवार मागणीही केली. परंतु, कुणीही लक्ष देत नाही, असा आरोप खात येथील सरपंच माधुरी वैद्य यांनी केला आहे.