लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लघुसिंचन विभागाच्या आसोली शिवारातील तलावाच्या दुरुस्तीला तत्काळ सुरुवात करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी ताराचंद सलामे यांनी तलावाच्या मध्यभागी सोमवारपासून (दि. २८) आमरण उपोषणाला सुरुवात केली. विशेष म्हणजे, त्यांनी तलावाच्या मध्यभागी मचाण बांधून सदर आंदोलन सुरू केले.आसोली (ता. रामटेक) शिवारातील या तलावाची निर्मिती २५ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने केली होती. या काळात प्रशासनाने एकदाही या तलावाची दुरुस्ती केली नाही. एकूण ९० एकरात पसरलेल्या या तलावाची सिंचनक्षमता ७० एकर असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले. वास्तवात, दुरुस्तीअभावी या तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने एकीकडे पाणी साठवण क्षमता कमी झाली असून, दुसरीकडे सिंचनक्षमताही घटली आहे.दरम्यान, ताराचंद सलामे यांनी पुढाकार घेत या तलावाच्या दुरुस्ती साफसफाईची मागणी करायल सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद कार्यालयात अनेकदा पत्रव्यवहार केला. परंतु, प्रशासनाने त्यांची ही मागणी गांभीर्याने घेतली नाही. निधी उपलब्ध होत नसल्याने तलावाची दुरुस्ती करणे शक्य नसल्याने प्रत्येकवेळी त्यांना लघुसिंचन विभागातील अधिकाऱ्यांकरवी सांगण्यात आले.वारंवार मागणी करूनही प्रशासन दखल घेत नसल्याचे लक्षात येता पूर्वसूचनेनुसार ताराचंद सलामे यांनी सोमवारपासून तलावाच्या मध्यभागी पाण्यात मचाण बांधून आंदोलनाला सुरुवात केली. सदर आंदोलन तलावाची दुरुस्ती व खोलीकरण करणे, त्याची किमान एक मीटरने उंची वाढविणे, पांदण रस्त्यांची दुरुस्ती करणे, तलावाच्या शेजारी असलेल्या डोंगरावरील अतिक्रमण दूर करणे, अधिकार अभिलेख १९५४-५५ नुसार अभिलेख रेकॉर्ड तयार करणे, आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे त्वरित वाटप करणे आदी मागण्यांसाठी करण्यात येत असल्याचे ताराचंद सलामे यांनी सांगितले.दरम्यान, उपोषणाला सुरुवात होताच तहसीलदार धर्मेश फुसाटे, लघुसिंचन विभागाचे सहायक अभियंता सलाम यांनी आंदोलनस्थळ गाठून ताराचंद सलामे यांची भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. तलावाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून शासनाला निधी मागण्यात आला आहे, त्यामुळे उपोषण मागे घ्यावे, अशी विनंतीही या अधिकाऱ्यांनी सलामे यांनी केली. मात्र, जोपर्यंत शासन निधी मंजूर करीत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची ठाम भूमिका सलामे यांनी घेतल्याने ही शिष्टाई फिसकटली. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक भागात शेतकऱ्याचे आमरण उपोषण तलावात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 00:42 IST
लघुसिंचन विभागाच्या आसोली शिवारातील तलावाच्या दुरुस्तीला तत्काळ सुरुवात करण्यात यावी, यासह अन्य मागण्यांसाठी ताराचंद सलामे यांनी तलावाच्या मध्यभागी सोमवारपासून (दि. २८) आमरण उपोषणाला सुरुवात केली. विशेष म्हणजे, त्यांनी तलावाच्या मध्यभागी मचाण बांधून सदर आंदोलन सुरू केले.
नागपूर जिल्ह्यातील रामटेक भागात शेतकऱ्याचे आमरण उपोषण तलावात !
ठळक मुद्देतलावाच्या दुरुस्तीची मागणी : ७० एकर सिंचन क्षमता