पेट्रोल पंप बंदची अफवा!
By Admin | Updated: July 1, 2014 01:00 IST2014-07-01T01:00:48+5:302014-07-01T01:00:48+5:30
पेट्रोल पंप बंद होण्याच्या अफवेने आज शहरात सर्वच पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या रांगा दिसून आल्या. अनेकांनी वाजवीपेक्षा जास्त पेट्रोलची खरेदी केली. बहुतांश पंपांवर ‘नो स्टॉक’चे बोर्ड

पेट्रोल पंप बंदची अफवा!
बहुतांश पंप कोरडे : एचपीच्या पंपावर दुपारपासून पुरवठा
नागपूर :पेट्रोल पंप बंद होण्याच्या अफवेने आज शहरात सर्वच पेट्रोल पंपांवर ग्राहकांच्या रांगा दिसून आल्या. अनेकांनी वाजवीपेक्षा जास्त पेट्रोलची खरेदी केली. बहुतांश पंपांवर ‘नो स्टॉक’चे बोर्ड झळकल्याने ग्राहकांची अडचण झाली.
स्टॉक नसल्याने हिंदुस्थान पेट्रोलियमचे बहुतांश पंप गेल्या दोन दिवसांपासून बंद आहेत. सोमवार सकाळपासूनच पंप बंद होणार असल्याची अफवा पसरल्याने ग्राहकांनी मिळेल त्या पंपावर वाजवीपेक्षा जास्त पेट्रोल खरेदी केले. त्यामुळे शहरात पेट्रोलची टंचाई होती. एचपीच्या पंपावर दुपारपासून पेट्रोलचा पुरवठा सुरू झाला आहे. शहरात मुबलक पेट्रोल असून ग्राहकांनी वाजवीपेक्षा जास्त पेट्रोल खरेदी करू नये, असे आवाहन विदर्भ पेट्रोल पंप असोसिएशनने केले आहे.
सर्वच पंपांवर मुबलक साठा
हिंदुस्थान पेट्रोलियमच्या जिल्ह्यातील सर्वच पंपावर पेट्रोलचा साठा असल्याची माहिती हिंदुस्थान पेट्रोलियमचे डेपो व्यवस्थापक धरणे यांनी लोकमतशी बोलताना दिली. शुक्रवारी नागपुरात पोहोचण्याची अपेक्षा असलेली रेल्व रेक सोमवारी सकाळी आली. त्यामुळे कंपनीच्या पंपांवर पेट्रोल वेळेत पोहोचू शकले नाही. ज्या पंपावर पेट्रोल होते, त्यांनी दिवसभर विक्री केली. पुण्याच्या लोणी रेल्वे स्थानकावरून निघालेल्या गाडीने भुसावळ, बडनेरा आणि वर्धा येथे अतिरिक्त थांबा घेतला. त्यामुळे एका टँकरमध्ये ६५ ते ६७ हजार लिटरचा साठा असलेली ५० टॅन्करची रेक नागपुरात तीन दिवस उशिरा पोहोचली. नागपूर डेपोतून नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये पेट्रोलचा पुरवठा होतो. या चार जिल्ह्यातील जवळपास ११० पंपांना दररोज २२५ ते २५० हजार लिटर पेट्रोलचा पुरवठा करण्यात येतो. सध्या डेपोत मुबलक साठा असल्याने ग्राहकांना टंचाईचा सामना करावा लागणार नाही, असे धरणे यांनी स्पष्ट केले.
वाजवीपेक्षा जास्त
पेट्रोल भरू नका
विदर्भ पेट्रोलपंप डिलर असोसिएशनचे अध्यक्ष हरविंदरसिंग भाटिया यांनी सांगितले की, मुंबईची रिफायनरी देखभाल दुरुस्तीसाठी तब्बल दोन महिने बंद राहणार आहे. नागपूर डेपोत मनमाड येथून येथून पुरवठा होतो, तर मनमाड येथे मुंबईहून पाईपलाईनने पेट्रोलचा पुरवठा करण्यात येतो. दोन दिवस एचपीच्या पंपांवर पेट्रोलची टंचाई होती तर काही दिवसानंतर भारत पेट्रोलियम आणि इंडियन पेट्रोलियमच्या रिफायनरी देखभाल दुरुस्तीसाठी बंद राहिल्यास या कंपन्यांच्याही पंपावर ग्राहकांना काही दिवसांसाठी पेट्रोलचा तुटवडा जाणवेल. त्यामुळे ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वाजवीपेक्षा जास्त पेट्रोल गाड्यांमध्ये भरू नये, असे आवाहन भाटिया यांनी केले. (प्रतिनिधी)