मंगलप्रभात लोढा यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या; राजे मुधोजी भोसले यांची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2022 11:06 IST2022-12-02T10:56:57+5:302022-12-02T11:06:52+5:30
राजे मुधोजी भोसले यांचे मुख्यमंत्र्यांना रोखठोक पत्र

मंगलप्रभात लोढा यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्या; राजे मुधोजी भोसले यांची मागणी
नागपूर : आपल्या सरकारमधील मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवाजी महाराजांशी संबंधित कार्यक्रमात शिवाजी महाराजांशी आपली व आपल्या मोहिमेची तुलना केली. या प्रकरणामुळे महाराष्ट्र हळूहळू धगधगतोय. येत्या काही दिवसात महाराष्ट्रात उद्रेक होईल व या उद्रेकाला सरकार जबाबदार राहील. हा उद्रेक थांबविण्यासाठी आपण तत्काळ आपल्या मंत्रिमंडळातील मंत्री लोढा यांचा माफीनामा न घेता मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन आपण संवेदनशील मुख्यमंत्री असल्याचे दाखवून द्यावे, अशी मागणीवजा इशारा देणारे पत्र राजे मुधोजी भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहे.
राजे मुधोजी भोसले यांनी या पत्रात म्हटले आहे की, आमचे पूर्वज महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती राजे शिवाजी महाराज भोसले आहेत. महाराष्ट्रातील जनता महाराजांचा अपमान कदापि सहन करणार नाही. ही भावना महाराजांचा वंशज या नात्याने व देशातील तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने मी व्यक्त करीत आहे. लोढा यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्रातील उद्रेक थांबेल. आपण महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आहात. कोणत्या अन्य देशातील राज्याचे मुख्यमंत्री नाही, याचे स्मरणही त्यांनी या पत्रात मुख्यमंत्री शिंदे यांना करून दिले आहे.
राज्यपाल व भाजप प्रवक्ते यांनीही छत्रपती शिवरायांबद्दल अवमानजनक वक्तव्ये केली आहेत. त्यांच्याबाबत आपण राष्ट्रपती, पंतप्रधान व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना पत्र लिहिणार असल्याचेही राजे मुधोजी भोसले यांनी स्पष्ट केले आहे.