नागपुरातील एमडी तस्करीची ‘राजस्थान लिंक’; आरोपींकडून ६.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
By योगेश पांडे | Updated: October 4, 2024 16:37 IST2024-10-04T16:36:35+5:302024-10-04T16:37:44+5:30
५५ ग्रॅम एमडी पावडर जप्त : दोन आरोपींना अटक

'Rajasthan link' to MD smuggling in Nagpur; 6.20 lakhs worth of goods seized from the accused
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनच्या पथकाने दोन एमडी तस्करांना अटक करत त्यांच्याकडून ५५ ग्रॅम पावडर जप्त केली. ही पावडर राजस्थानमधील दोन आरोपींची असल्याचा दावा अटकेतील आरोपींनी केला आहे. एमडी तस्करीची राजस्थान लिंक समोर आल्याने पोलीस आता त्या दिशेने तपास करत आहेत.
गुरुवारी रात्री अकरा वाजताच्या सुमारास शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर होते. कावरापेठ करुणानगर येथील मार्गावर दोन व्यक्ती एका मोटारसायकलजवळ संशयास्पदरित्या आढळले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्यांच्याजवळ ५५ ग्रॅम एमडी पावडर आढळली. पोलिसांनी अब्दुल लतीफ अब्दुल रज्जाक (४८, मुदलीयार ले आऊट, शांतीनगर) व शाहरूख हबीब खान (३२, शांतीनगर) यांना अटक केली. चौकशीदरम्यान त्यांनी ती पावडर राजस्थानमधील डग येथील दशरथ सिंग (३०) तसेच कैलास बगडुलाल वर्मा (३०) यांची असल्याचा दावा केला. पोलिसांनी आरोपींकडून ६.२० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. तर इतर दोन आरोपींविरोधात गुन्हा नोंदवत त्यांचा शोध सुरू आहे. अटकेतील आरोपींना शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. पोलीस निरीक्षक मुकुंद ठाकरे, मधुकर काठोके, दशरथ मिश्रा, विजय श्रीवास, संतोषसिंग ठाकूर, भूषण भगत, जितेश रेड्डी, दीपक दासरवार, दीपक लाकडे, कपिलकुमार तांडेकर, विशाल रोकडे, प्रमोद देशभ्रतार यांच्या पथकाने ही कारवाई केली.