Raja Dronkar, a senior activist of the Ambedkari movement, passed away | आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते राजा द्रोणकर यांचे निधन

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते राजा द्रोणकर यांचे निधन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहर जिल्हा युवक कॉंग्रेस कमिटीचे महासचिव, बिल्डर असोसिएशन नागपूरचे माजी अध्यक्ष आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते राजा द्रोणकर यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ५४ वर्षाचे होते. त्यांच्या पार्थिवावर वैशाली घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
द्रोणकर यांनी लष्करीबाग या मागास वस्तीतून विद्यार्थीदशेपासूनच आंबेडकरी चळवळीत स्वत:ला झोकून दिले होते. युवकांच्या अनेक आंदोलनात ते सक्रिय होते. पुढे शहर जिल्हा युवक कॉंग्रेसचे अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झाली. उत्तर नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा साजरा करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. दरवर्षी दीक्षाभूमीवर येणाऱ्या बांधवांसाठी त्यांच्या पुढाकाराने ‘संकल्प’ या स्टॉलवरून भोजनदान सेवा दिली जात आहे. विशेष म्हणजे उत्तर नागपूर विकास आघाडीचे ते अध्यक्ष होते व दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख तसेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे निकटवर्तीय होते. उत्तरच्या विधानसभेच्या जागेचे दावेदारही मानले जात होते परंतु त्यांना अपघात झाला आणि या अपघातामुळे त्यांना मेंदूचा पक्षाघात झाला. या आजाराचा सामना करताना अखेर गुरुवारी त्यांचे निधन झाले.
अंत्यसंस्कारादरम्यान झालेल्या शोकसभेत माजी मंत्री रणजित देशमुख, आमदार नितीन राऊत, राजाभाऊ करवाडे, जयप्रकाश गुप्ता, प्रफुल्ल गुडदे पाटील, माजी आमदार डॉ. मिलिंद माने, विद्यापीठाचे माजी कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, अशोक मेंढे, नरेश वहाणे, राजन वाघमारे, प्रकाश कुंभे, जयंत टेंभूरकर यांच्यासह कॉंग्रेस, भाजप तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Raja Dronkar, a senior activist of the Ambedkari movement, passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.