विदर्भात संततधार; जनजीवन विस्कळित, पिकांना संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 13:02 IST2019-07-30T13:01:11+5:302019-07-30T13:02:30+5:30
गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सुरू असलेल्या संततधारेमुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधील पिकांना संजीवनी मिळाली आहे. नागपूरसह अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची अखंड रिमझिम सुरू आहे.

विदर्भात संततधार; जनजीवन विस्कळित, पिकांना संजीवनी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: गेल्या दोन दिवसांपासून पावसाच्या सुरू असलेल्या संततधारेमुळे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमधील पिकांना संजीवनी मिळाली आहे. नागपूरसह अमरावती, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा व चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची अखंड रिमझिम सुरू आहे.
गोंदिया जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पातील पाणी साठ्यात वाढ होताना दिसते आहे. पावसामुळे रोवणीच्या कामाला वेग आला आहे. शेतकरी सुखावला असून दुबार पेरणीचे संकट दूर झाले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.
भंडारा जिल्ह्यात गेल्या २४ तासात २८.५ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. पवनी तालुक्यात सर्वाधिक म्हणजे १०६.४ मि.मि. इतका पाऊस नोंदवण्यात आला. पावसामुळे कुठे नुकसान झाल्याचे वृत्त मात्र नाही.
यवतमाळ जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३६ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. नाले दुथडी भरून वाहत आहेत. आष्टोना नाल्याला पूर आल्याने वणी-मारेगाव-वडकी वाहतूक थांबली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या भद्रावती तहसील अंतर्गत येत असलेल्या तेलवासा रोड वरील रेल्वेच्या भूयारी मार्गात मंगळवारी सकाळी चार फूट पाणी भरल्यामूळे घुग्गुसकडे जाणारी वाहतूक बंद झाली आहे. या मार्गावर असलेल्या चिरादेवी, ढोरवासा, तेलवासा, पिपरी, कोच्ची, घोनाड या गावांचा भद्रावतीशी संपर्क तुटला आहे.
वर्धा जिल्ह्यातही संततधार सुरू असून नदी-नाले पाण्याने भरून वाहत आहेत. गडचिरोलीतील काही गावांमधले लहान पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.