रेल्वे घडविणार नागपूरहून श्री रामेश्वरम तिरुपती दक्षिण यात्रा
By नरेश डोंगरे | Updated: September 22, 2023 21:48 IST2023-09-22T21:48:15+5:302023-09-22T21:48:34+5:30
देखो अपना देश : भारत गौरव पर्यटक ट्रेन : २९ नोव्हेंबरला इंदूरमधून होणार प्रारंभ

रेल्वे घडविणार नागपूरहून श्री रामेश्वरम तिरुपती दक्षिण यात्रा
नागपूर : इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲन्ड टूरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (आयआरसीटीसी)ने भारतातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने 'भारत गाैरव पर्यटन ट्रेन' चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनच्या माध्यमातून भारतातील आध्यात्मिक आणि पर्यटनाचे केंद्र असलेल्या ठिकाणांची सफर देशी -विदेशी प्रवाशांना घडविली जाणार आहे.
भारतात अनेक मोठमोठी धार्मिक आणि पाैराणिक ठिकाओ आहेत. जेथे वर्षभर लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करतात. यातील काही ठिकाणी निसर्गाने मुक्त उधळण केल्यामुळे तेथील साैंदर्याचा आनंद घेण्यासाठी देशी-विदेशी पर्यटकांची वर्षभर गर्दी असते. या सर्व ठिकाणांची ओळख सर्वांना व्हावी आणि त्यांना तेथे कमी खर्चात चांगला प्रवास करता यावा तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा जपतानाच भारतीय पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने आयआरसीटीसीने 'देखो अपना देश तसेच एक भारत श्रेष्ठ भारत' या उपक्रमाअंतर्गत भारत गाैरव पर्यटन ट्रेन सुरू चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा शुभारंभ २९ नोव्हेंबरला इंदूर (मध्यप्रदेश) होणार आहे. काही तासांतच ही ट्रेन नागपुरात पोहचेल आणि येथून प्रवाशांची ‘श्री रामेश्वरम तिरुपती दक्षिण दर्शन यात्रा’ सुरू होईल.
१० दिवस ११ रात्रींचा प्रवास
२९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या दर्शन यात्रेत इंदूर, देवास, उज्जैन, सुजालपूर, सिंहोर, राणी कमलापती, इटारसी आणि नागपूर स्थानकावरून प्रवासी या ट्रेनमध्ये बसू शकतील. त्यानंतर मल्लिकार्जुन, तिरुपती, रामेश्वरम, मदुराई आणि कन्याकुमारी या दर्शनीय स्थळांचे पर्यटन करतील.
असा येईल खर्च
या संपूर्ण यात्रेचा प्रति व्यक्ती खर्च १८, ५०० रुपये (एसएल इकॉनॉमी श्रेणी) २९,५०० (थ्री एसी स्टॅण्डर्ड श्रेणी) आणि ३८,६०० (टू एसी कन्फर्ट श्रेणी) असा राहील.
सर्व सुविधा मिळणार
यात्रेदरम्यान प्रवाशांना ऑन बोर्ड तसेच ऑफ बोर्ड भोजन, दर्शनीय स्थळाची यात्रा करताना चांगल्या बसेस, राहण्याची चांगली व्यवस्था आणि प्रवाशांचा विमा या सर्व सुविधा रेल्वे बोर्ड उपलब्ध करून देणार आहे.