युक्रेनमधील रेल्वे ठरतेय विद्यार्थ्यांसाठी ‘लाईफलाईन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2022 07:00 IST2022-03-01T07:00:00+5:302022-03-01T07:00:13+5:30

Nagpur News हंगेरी सीमेच्या मार्गे तेथील भारतीय नागरिक व विद्यार्थी युक्रेनमधून बाहेर पडू शकत आहेत. आपत्कालीन स्थिती लक्षात घेता युक्रेन सरकारनेदेखील जास्त प्रमाणात रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Railways in Ukraine is a 'lifeline' for students | युक्रेनमधील रेल्वे ठरतेय विद्यार्थ्यांसाठी ‘लाईफलाईन’

युक्रेनमधील रेल्वे ठरतेय विद्यार्थ्यांसाठी ‘लाईफलाईन’

ठळक मुद्देयुक्रेन सरकारचेदेखील सहकार्य संचारबंदी हटल्याने मदतकार्याला परत वेग, रेल्वे स्थानकांवर गर्दी

योगेश पांडे

नागपूर : युक्रेनची राजधानी कीव्ह व आजूबाजूच्या भागात अडकलेले हजारो विद्यार्थी सुखरूप मायदेशी परतण्याची चिन्हे आहेत. कीव्हमधील संचारबंदी हटली असून विद्यार्थ्यांच्या मदतकार्याला वेग आला आहे. हंगेरी सीमेच्या मार्गे तेथील भारतीय नागरिक व विद्यार्थी युक्रेनमधून बाहेर पडू शकत आहेत. रस्तेमार्गावर अडथळे असल्याने रेल्वेच्या माध्यमातून तेथे पोहोचणे शक्य झाले असून आपत्कालीन स्थिती लक्षात घेता युक्रेन सरकारनेदेखील जास्त प्रमाणात रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या रेल्वेगाड्याच हजारो विद्यार्थ्यांसाठी ‘लाईफलाईन’ ठरणार आहेत.

मूळचे नागपूरकर व युक्रेनमध्ये मागील १७ वर्षांपासून असलेले एअरोस्पेस वैज्ञानिक राजेश मुनेश्वर यांनी ‘लोकमत’ला ‘ग्राऊंड झीरो’वरून ही माहिती दिली आहे. तेदेखील चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर व जवळून मृत्यूची भीती अनुभवल्यानंतर हंगेरी सीमेच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेतून प्रवास करत आहेत. युक्रेनमधील भारतीय दूतावासाने याबाबत युक्रेन सरकारशी समन्वय साधला व रेल्वेमार्गाने देशाच्या पश्चिमी सीमेकडे जाण्यासाठी जास्तीत जास्त रेल्वेगाड्या सुरू करण्यास तेथील प्रशासनाने मान्यता दिली. दूतावासाने विद्यार्थ्यांसाठी नवे दिशानिर्देश जारी केले असून रेल्वेमार्गानेच पश्चिमी सीमेकडे जाण्याची सूचना केली आहे.

रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी, आक्रमक न होण्याचे आवाहन

कीव्ह व आजूबाजूच्या भागातील रेल्वे स्थानकांवर विद्यार्थी व नागरिकांची गर्दी झाली आहे. युक्रेनकडून विशेष रेल्वेगाड्यादेखील सोडण्यात येत आहेत. त्यामुळे कुणीही जागा मिळाली नाही म्हणून आक्रमक होऊ नये. गर्दी असल्याने रांगेत उभे राहण्याची तयारी ठेवावी तसेच ऐनवेळी रेल्वेगाड्यांना विलंब झाला तरी संयम ठेवावा, असे आवाहन भारतीय दूतावासाकडून करण्यात आले आहे. युक्रेन सरकारकडून भारतीयांना शक्य तेवढी मदत करण्यात येत आहे. त्यांच्याकडूनदेखील भारतीयांना सातत्याने सूचना देण्यात येत असल्याची माहिती मुनेश्वर यांनी दिली.

पूल ‘ब्लॉकेज’मुळे अडकले साडेतीनशे विद्यार्थी

राजधानी कीव्हहून दक्षिणेला सुमारे पाचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मायकोलेव्ह येथे साडेतीनशेहून अधिक भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. तेथील पुलांवर वाहतूक बंद झाली असून रेल्वे स्थानकावरदेखील हल्ला करण्यात आला. त्यामुळे मायकोलेव्हचा युक्रेनच्या इतर भागाशी संपर्क तुटला असून या विद्यार्थ्यांना काहीही करून तेथून काढून जवळील पश्चिमी सीमेपर्यंत पोहोचविणे हे मोठे आव्हान असल्याची माहिती राजेश मुनेश्वर यांनी दिली. हे विद्यार्थी सातत्याने भारतीय दूतावास व तेथील भारतीय नागरिकांच्या संपर्कात आहेत.

भारतीयांनीच केली बसची व्यवस्था

कीव्ह या शहरात सुमारे १८ भारतीय विद्यार्थी अडकले होते व त्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचादेखील समावेश होता. या विद्यार्थ्यांना मदत पुरवावी यासाठी नांदेडच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मुनेश्वर यांनादेखील संपर्क केला. मुनेश्वर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था केली. बससाठी ४९ प्रवाशांची आवश्यकता होती. विनय नावाच्या एका विद्यार्थ्याने उर्वरित विद्यार्थ्यांशी समन्वय साधला व बस पश्चिमी सीमेकडे रवाना झाली.

Web Title: Railways in Ukraine is a 'lifeline' for students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.