लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोको पायलट एस. बी. सहारे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून रेल्वे रुग्णालयाच्या परिसरात निदर्शने केली.सेंट्रल रेल्वे मजदूर संघ, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, एससी, एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशन, आॅल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशिवाय २०० पेक्षा अधिक कर्मचारी रेल्वे रुग्णालयाबाहेर जमले. त्यांनी शवविच्छेदन झाल्यानंतर रुग्णालयात आणलेल्या मृतदेहाला नेण्यास विरोध केला. सदर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर कर्मचारी शांत झाले. मिळालेल्या माहितीनुसार लोको पायलट एस. बी. सहारे यांचा शुक्रवारी सकाळी रेल्वे रुग्णालयात हृदयविकारामुळे मृत्यू झाला. या घटनेमुळे नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे विभागीय सचिव हबीब खान, साजी कोसी, सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे झोनल अध्यक्ष देबाशीष भट्टाचार्य, विभागीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह, विभागीय संघटक ई. व्ही. राव, एससी, एसटी रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे निकेश उके आणि पदाधिकाऱ्यांनी रेल्वे रुग्णालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी त्यांनी मुख्य आरोग्य अधिक्षक डॉ. व्ही. के. आसुदानी यांची बदली करून ड्युटीवरील डॉक्टरांना निलंबित करण्याची आणि सहारे यांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालय प्रशासनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी एस अँड टी विभागातील कर्मचारी बी. एल. शर्मा यांचा मृत्यूही हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप केला. लोको पायलट सहारे यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांनी खाजगी रुग्णालयात ईजीसी केला. हृदयाच्या ठोक्यात गडबड असल्याचे समजताच ते रेल्वे रुग्णालयात भरती झाले. येथे डॉक्टरांनी पुन्हा ईसीजी केला. परंतु त्यांच्यावर हृदयाशी संबंधित काहीच उपचार करण्यात आले नाही. त्यांना खाजगी रुग्णालयात पाठवावयास पाहिजे होते. परंतु तसे न केल्यामुळे सहारे यांना हार्ट अटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाला. याबाबत स्थानिक नेत्यांनी हत्येचा आरोप लावून यास रेल्वे रुग्णालयाचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचे मत व्यक्त केले आहे.‘एडीआरएम’चेही ऐकले नाहीरेल्वे रुग्णालयासमोर तणाव झाल्यामुळे ‘एडीआरएम’ त्रिलोक कोठारी रुग्णालयाजवळ पोहोचले. परंतु संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचेही ऐकले नाही. पदाधिकाऱ्यांनी मृतदेह नेण्यास विरोध केला. अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर प्रकरण शांत झाले. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाने दोन डॉक्टरांची समिती गठित केली आहे. समितीत मुंबई आणि पुण्यातील डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. समितीचा अहवाल आल्यांनतर संबंधित अधिकारी, डॉक्टरांवर कारवाई होऊ शकणार आहे.
नागपुरात लोको पायलटच्या मृत्यूमुळे संतापले रेल्वे कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:43 IST
लोको पायलट एस. बी. सहारे यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यामुळे संतापलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप करून रेल्वे रुग्णालयाच्या परिसरात निदर्शने केली.
नागपुरात लोको पायलटच्या मृत्यूमुळे संतापले रेल्वे कर्मचारी
ठळक मुद्देरेल्वे रुग्णालयात ‘सीएमएस’ला घेराव : उपचारात बेजबाबदारपणा केल्याचा आरोप