Raid on hotels, cafes operating in Nagpur | नागपुरात सुरू असलेल्या हॉटेल, कॅफेवर छापे 

नागपुरात सुरू असलेल्या हॉटेल, कॅफेवर छापे 

ठळक मुद्देबजाजनगर पोलिसांची कारवाई : ऑनलाईनच्या नावाखाली दुकानदारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचा मनाई आदेश असूनही खाद्यपदार्थ विक्री करण्यासाठी आस्थापना सुरू ठेवणाऱ्या हॉटेल, कॅफेत बजाजनगर पोलिसांनी गुरुवारी, शुक्रवारी छापे घातले. २४ तासात तीन ठिकाणी पोलिसांनी कारवाई केल्याने परिसरात खळबळ निर्माण झाली आहे.
नागरिकांनी कुठेच गर्दी करू नये, गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, हे ध्यानात घेऊन राज्य सरकारने ठिकठिकाणचे मॉल्स, हॉटेल्स, जीम, जलतरण तलाव तसेच जेथे गर्दी होते, अशा चहा टपरीपासून पान टपरीपर्यंतची सर्व आस्थापना (दुकाने) बंद करण्याचे आदेश दिले. नागपुरात जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश जारी केला असून, पोलिसांनी कलम १४४ जारी केले आहे. असे असूनही बजाजनगरातील कोतवालनगरात असलेले द ब्रेड बॉक्स आणि तात्या टोपेनगरात असलेले सुलभ फरसाण अ‍ॅण्ड फॅमिली फूड सुरु असल्याची माहिती पोलिसांना कळली. त्यावरून बजाजनगरचे ठाणेदार राघवेंद्र क्षीरसागर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या दोन्ही ठिकाणी गुुरुवारी रात्री छापे घातले. मनाई असताना हॉटेल सुरू ठेवल्याबद्दल ब्रेड बॉक्सचे संचालक चैतन्य लेले आणि फॅमिली फूडचे संचालक महेश मुनेश्वर या दोघांविरुद्ध कलम १८८ अन्वये कारवाई केली.

ऑनलाईन ऑर्डर 
त्याच प्रमाणे शुक्रवारी दुपारी ४ च्या सुमारास लक्ष्मीनगरातील ग्रीन पिझ्झा नामक रेस्टॉरंटमध्ये पोलिसांनी छापा घातला. येथेही खाद्यपदार्थ तयार करताना कर्मचारी आढळले. ऑनलाईन ऑर्डर देण्यासाठी खाद्यपदार्थ तयार केले जात असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली. यावेळी ऑर्डरच्या पावत्याही कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दाखविल्या. मात्र, मनाई असताना हॉटेल सुरू ठेवल्याबद्दल ग्रीन पिझ्झाचे संचालक शरद राठी यांच्यावर पोलिसांनी कारवाई केली.

Web Title: Raid on hotels, cafes operating in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.