नागपुरातील कामठी, अजनीतील कुंटणखान्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 00:17 IST2018-10-26T00:15:02+5:302018-10-26T00:17:15+5:30
परिमंडळ ५ चे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या पथकाने कामठीतील एका लॉजवर छापा मारून पाच जणांना तर गुन्हे शाखेच्या एसएसबीने अजनीत छापा मारून दोन महिलांना अटक केली.

नागपुरातील कामठी, अजनीतील कुंटणखान्यावर छापा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : परिमंडळ ५ चे उपायुक्त हर्ष पोद्दार यांच्या पथकाने कामठीतील एका लॉजवर छापा मारून पाच जणांना तर गुन्हे शाखेच्या एसएसबीने अजनीत छापा मारून दोन महिलांना अटक केली.
कामठीतील आरोपींची नावे संजय रामसिंग मोहबे (वय ५६), जगदीश संजय मोहबे (वय २७), धर्मपाल संजय मोहबे (३१, रा. रविदासनगर, कामठी), लताबाई विजय डोलेकर (वय ६२, रा. येरखेडा) आणि मोहम्मद साजिद शफीक (वय २६, रा. कामठी) आहेत. मोहबे परिवाराची कामठीतील भोयर कॉलेजजवळ रॉयल लॉजिंग अॅन्ड बोर्डिंग आहे. तेथे वेश्याव्यवसाय चालवला जातो, अशी माहिती पोलीस उपायुक्त हर्ष पोद्दार यांना मिळाली. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी बनावट ग्राहक लॉजमध्ये पाठविण्यात आले. तेथे ग्राहकांकडून रक्कम घेऊन त्यांना वेश्याव्यवसाय करणाऱ्या दोन तरुणी दाखविण्यात आल्या. ग्राहकाने इशारा करताच पोलिसांचे पथक तेथे धडकले. त्यांनी उपरोक्त पाच आरोपींना अटक केली. त्यांच्या ताब्यातून दोन तरुणींची सुटका करण्यात आली. उपरोक्त आरोपींविरुद्ध कामठी ठाण्यात पिटा कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
अशाच प्रकारे गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) विश्वकर्मानगर, अजनीत छापा मारला. येथे विजयालक्ष्मी ऊर्फ भावना कनक राव (वय ५०) आणि मनीषा ऊर्फ हर्षा रवींद्र पवार (वय २६, रा. पार्वतीनगर) या दोघींना कुंटणखाना चालविण्याच्या आरोपात ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या ताब्यातून वेश्याव्यवसाय करणारी एक तरुणी सोडविण्यात आली. या दोघींविरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.