राहुल गांधी संघाबाबत अज्ञानीच, राष्ट्रसेविका समितीचे प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2017 21:51 IST2017-10-10T21:51:26+5:302017-10-10T21:51:45+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना स्थान नाही, या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेला राष्ट्रसेविका समितीतर्फे जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राहुल गांधी हे काँग्रेसचे जबाबदार नेते असून, त्यांनी सखोल माहिती घेऊन बोलणे अपेक्षित आहे.

राहुल गांधी संघाबाबत अज्ञानीच, राष्ट्रसेविका समितीचे प्रत्युत्तर
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांना स्थान नाही, या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेला राष्ट्रसेविका समितीतर्फे जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राहुल गांधी हे काँग्रेसचे जबाबदार नेते असून, त्यांनी सखोल माहिती घेऊन बोलणे अपेक्षित आहे. राष्ट्रसेविका समितीची संघाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असून संघाबाबत राहुल गांधींचे अज्ञान दिसून आले आहे, या शब्दांत प्रमुख संचालिका शांताक्का यांनी टीका केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना शांताक्का यांनी मंगळवारी आपली भूमिका मांडली
राहुल गांधींनी संघावर जोरदार हल्लाबोल करत महिलांना काहीच स्थान नसल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत शांताक्का यांनी प्रतिक्रिया दिली. गेल्या ८१ वर्षांपासून राष्ट्रसेविका समिती देशात कार्यरत आहे. स्वातंत्र्याअगोदरपासून सक्रिय असलेली ही देशातील एकमेव अखिल भारतीय महिला संघटना आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या समकक्षच दर्जा देण्यात येतो व आद्यसरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रेरणेतूनच मावशी केळकर यांनी समितीची स्थापना केली. संघ आणि राष्ट्र सेविका समिती हे बहीण-भावाप्रमाणे आहेत. संघाच्या दरवर्षी मार्च महिन्यात होणाºया अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत राष्ट्र सेविका समितीचा सहभाग असतो. तसेच परिवारातील विविध संघटनांमध्ये कार्यरत असलेल्या महिला प्रतिनिधीदेखील संघाच्या निर्णय प्रक्रियेत निर्णायक भूमिका बजावतात. विशेष म्हणजे याला प्रसार माध्यमांकडूनदेखील प्रसिद्धी मिळते. अशास्थितीत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याकडून असे बेजबाबदार वक्तव्य अपेक्षित नाही, असे त्यांनी प्रतिपादन केले.
विदेशातदेखील सुरू आहे कार्य
यावेळी शांताक्का यांनी राहुल गांधी यांनी संघाबाबत सखोल अभ्यास करावा, असे म्हणताना समितीच्या कार्याचा संक्षिप्त लेखाजोखाच मांडला. देशभरात तीन हजारहून अधिक शाखा व अन्य सेवा कार्यात समितीचे योगदान आहे. संपूर्ण देशभरात राष्ट्र सेविका समितीचे कार्य सुरू असून सुमारे १२ देशात हिंदू सेविका समितीच्या नावाने कार्य सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.