राहुल गांधींनी साधला महिला कार्यकर्त्यांशी संवाद

By Admin | Updated: April 30, 2015 02:34 IST2015-04-30T02:34:31+5:302015-04-30T02:34:31+5:30

रविभवन. वेळ रात्रीची १०.३० वा.ची. सुरक्षेसाठी लावण्यात आलेले कठडे झुगारून पुढे आलेल्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा उत्साह कमालीचा वाढलेला होता.

Rahul Gandhi interacted with women activists led by | राहुल गांधींनी साधला महिला कार्यकर्त्यांशी संवाद

राहुल गांधींनी साधला महिला कार्यकर्त्यांशी संवाद

नागपूर : स्थान - रविभवन. वेळ रात्रीची १०.३० वा.ची. सुरक्षेसाठी लावण्यात आलेले कठडे झुगारून पुढे आलेल्या काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचा उत्साह कमालीचा वाढलेला होता. त्यांच्या चेहऱ्यावर राहुल गांधी यांच्याशी भेट झाल्याचे समाधान स्पष्टपणे झळकत होते. अल्पवेळच का होईना राहुल गांधी यांनी महिला कार्यकर्त्यांची भेट घेतली आणि त्त्यांचे म्हणणे गंभीरपणे ऐकून घेतले. काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर मजबूत करण्यासाठी जमिनीशी जुळलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान केला जाईल, असे आश्वासनही दिले. विदर्भातील शेतकऱ्यांचे दुख: जाणून घेण्यासाठी राहुल गांधी गुरुवारी पहाटे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी बुधवारी रात्री त्यांचे नागपूर येथे आगमन झाले. रात्री त्यांचा रविभवनमध्ये मुक्काम होता.
राहुल गांधी येणार म्हणून मोठ्या संख्येने कार्यकर्ते रविभवन परिसरात एकत्र आले होते. त्यात महिला कार्यकर्त्यांची संख्याही लक्षणीय होती. ठीक १०.०५ मिनिटांनी राहुल यांच्या वाहनांचा काफिला रविभवनात दाखल झाला. कारमधूनच राहुल यांनी कार्यकर्त्यांना हात उंचावून अभिवादन केले. मात्र कार्यकर्त्यांना त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट हवी होती. त्यामुळे त्यांची तगमग वाढत चालली होती. तेवढ्यात राहुल गांधी महिलांना भेटणार, असा निरोप आला. त्यामुळे महिलांमध्ये उत्साह संचारला. त्यांनतर राहुल गांधी बाहेर आले व त्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. यात डॉ. रिचा जैन, शहर महिला काँग्रेस अध्यक्षा प्रज्ञा बडवाईक, कांता पराते यांच्यासह इतरही कार्यकर्त्यांचा समावेश होता.
राहुल गांधींशी भेट झाल्यावर रिचा जैन म्हणाल्या, काँग्रेससोबत अनेक वर्षे जुळलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान व्हावा, अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली. त्यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व सकारात्मक प्रतिसाद दिला.
प्रज्ञा बडवाईक म्हणाल्या, स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी केली. या मागणीवरही गंभीरपणे विचार करण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले.युवा कार्यकर्त्यांना पक्षात आणि निवडणुकीत संधी दिल्यास यामुळे पक्षात नवचैतन्य निर्माण होईल व त्यामुळे पक्ष मजबूत होईल, असे कांता पराते म्हणाल्या. राहुल गांधी यांच्यामुळे पक्ष पुन्हा एकदा नवी उंची गाठेल, अशी अपेक्षा या महिलांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
पाच कॉटेज आणि २१ कक्ष
राहुल गांधी आणि त्यांच्यासोबत आलेले नेते आणि सुरक्षा अधिकाऱ्यांसाठी रविभवनातील पाच कॉटेजेस आणि २१ वातानुकूलित कक्ष राखीव ठेवण्यात आले आहेत. दोन दिवसांपासून कक्ष आरक्षित आहेत. राहुल गांधी यांचा मुक्काम कॉटेज क्रमांक दोनमध्ये तर विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी कॉटेज क्रमांक एक राखीव आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासाठी कॉटेज क्रमांक ४, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यासाठी कॉटेज क्रं. १० आणि बाला बच्चन यांच्यासाठी कॉटेज क्र. ११ मध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. राहुल यांचा मुक्काम असल्याने या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून राहुल ज्या कॉटेजमध्ये थांबले आहेत त्याची कसून तपासणी करण्यात आली आहे..

Web Title: Rahul Gandhi interacted with women activists led by

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.