Ragi accused of stealing trolleybags arrested in Rango: Nagpur RPF action | ट्रॉलीबॅग चोरी करणाऱ्या आरोपीस रंगेहात अटक : नागपूर आरपीएफची कारवाई
ट्रॉलीबॅग चोरी करणाऱ्या आरोपीस रंगेहात अटक : नागपूर आरपीएफची कारवाई

ठळक मुद्देलगेज स्कॅनर मशिनजवळील घटना

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : दोन लाखांचा मुद्देमाल असलेली प्रवाशाची ट्रॉलीबॅग घेऊन जात असलेल्या आरोपीला रेल्वे सुरक्षा दलाने रंगेहात अटक केली. ही घटना रविवारी रात्री ११ वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या लगेज स्कॅनरजवळ घडली.
रविवारी रात्री ११ वाजता रेल्वे सुरक्षा दलाचा जवान तरुण कुमार लगेज स्कॅनर मशिनजवळ ड्युटीवर होता. त्याला एक व्यक्ती संशयास्पदरीत्या कत्थ्या रंगाची ट्रॉलीबॅग घेऊन जाताना दिसला. त्याला थांबविले असता तो ट्रॉलीबॅग सोडून पळ काढत होता. त्यावर आरपीएफ जवानाने त्याला पाठलाग करून पकडले. चौकशीत त्याने समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने आरपीएफचे जवान शशिकांत गजभिये, मुनेश कुमार यांना बोलावून आरपीएफ ठाण्यात उपनिरीक्षक गौरीशंकर एडले, सहायक उपनिरीक्षक बघेल यांच्यासमोर हजर केले. आरोपीने आपले नाव संजय मुन्ना यादव (१८) रा. पवासा, महाकाल, उज्जैन (मध्यप्रदेश) असे सांगितले. ही बॅग प्लॅटफार्म क्रमांक ३ वर आलेल्या छत्तीसगड एक्स्प्रेसमधून चोरी केल्याची कबुली त्याने दिली. बॅगमध्ये रोख २५५० रुपये आणि दागिन्यांसह दोन लाखांचा मुद्देमाल होता. कागदोपत्री कारवाईनंतर आरोपीला मुद्देमालासह लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त भवानी शंकर नाथ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Web Title: Ragi accused of stealing trolleybags arrested in Rango: Nagpur RPF action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.