पेन्शनसाठी दौड - मोलकरणींचा एल्गार : अटक आणि सुटका
By Admin | Updated: March 13, 2015 02:42 IST2015-03-13T02:42:25+5:302015-03-13T02:42:25+5:30
म्हातारपणाच्या उपजीविकेसाठी पेन्शन देण्यात यावे, या मागणीसाठी विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पेन्शन दौड ...

पेन्शनसाठी दौड - मोलकरणींचा एल्गार : अटक आणि सुटका
नागपूर : म्हातारपणाच्या उपजीविकेसाठी पेन्शन देण्यात यावे, या मागणीसाठी विदर्भ मोलकरीण संघटनेतर्फे गुरुवारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पेन्शन दौड (मोर्चा) काढण्यात आली. हजारावर मोलकरणी या दौडमध्ये सहभागी झाल्या होत्या. झाडू, ताट वाटी घेऊन आलेल्या या मोलकरणींनी घोषणा देत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी ही दौड मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचू दिली नाही.
सर्वोदय आश्रमसमोर पोलिसांनी कठडे लावून दौड रोखली. मोलकरणींनीसुद्धा ठिय्या मांडला आणि मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत जागेवरून न हटण्याचा निर्णय घेतला. परंतु सायंकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने संतप्त मोलकरणींनी पोलिसांचे कठडे तोडून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. यात हजारो मोलकरणींना पोलिसांनी अटक केली.
खासदार, आमदार आणि शासकीय कर्मचाऱ्यांना म्हातारपणाच्या उपजीविकेसाठी पेन्शन देण्यात येते. परंतु जीवनभर हालअपेष्ठा सहन करणाऱ्या मोलकरणींना, घरेलू कामगारांना मात्र थकत्या वयात कुणीच काम देत नाही. त्यांच्याकडून काम होत नाही. जवळ पैसाही नसतो. अशा परिस्थितीत घेरलू कामगारांना म्हातारपणाची पेन्शन देण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर पेन्शन दौड आयोजित करण्यात आली होती. विदर्भ मोलकरीण संघटनेच्या अध्यक्षा रूपा कुळकर्णी आणि सचिव विलास भोंगाडे यांच्या नेतृत्वात गुरुवारी दुपारी संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही दौड निघाली. यात हजारावर मोलकरणी सहभागी झाल्या होत्या. संविधान चौक, शासकीय मुद्रणालय, विज्ञान महाविद्यालय, महाराजबाग चौक, अमरावती रोड, गिरीपेठ मार्गे ही दौड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या धरमपेठ निवासस्थानी जाणार होती. परंतु पोलिसांनी ही दौड बोले पेट्रोल पंपाजवळील सर्वोदय आश्रम चौकातच अडविली. या ठिकाणी मोलकरणींची जाहीर सभा झाली. मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन देणारे पत्र येत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा पवित्रा रूपा कुळकर्णी अणि विलास भोंगाडे यांनी घेतला. मोलकरणींनीसुद्धा येथेच दडून राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान कठडे लावले जात असल्याने पोलीस आणि मोलकरणींमध्ये शाब्दीक बाजाबाचीसुद्धा झाली. सायंकाळी ४.३० वाजताच्या दरम्यान मुंबईवरून मुख्यमंत्र्यांच्या सचिवांचे पत्र आले. परंतु पत्रात कुठलेही ठोस आश्वासन न मिळाल्याने मोलकरणी संतप्त झाल्या आणि कठडे तोडून रस्ता जाम करण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि मोलकरणींमध्ये शाब्दीक बाजाबाचीही झाली. मोलकरणी संतप्त झाल्याने आणि रस्त्यावर येऊन रास्ता रोको करीत असल्याने वाहतूक काही वेळ खोळंबली होती. अखेर पोलिसांनी मोलकरणींना अटक करून पोलीस लाईन टाकळीला नेले.
या दौडमध्ये कांता मडामे, सुजाता भोंगाडे, छाया चवळे, वंदना माटे, भाग्यश्री ढगे, श्वेता धोटे, सुरेखा डोंगरे, संगीता वाकोडे, ममता पाल, रुखमा भांगे, वंदना फुले आदींसह शेकडो कार्यकर्त्या व घरेलू कामगार सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)