मोवाड पूरग्रस्तांचे प्रश्न कायमच
By Admin | Updated: September 25, 2016 03:18 IST2016-09-25T03:18:04+5:302016-09-25T03:18:04+5:30
मोवाड पुराच्या घटनेला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. या पुराने शेकडो कुटुंबीयांचे होत्याचे नव्हते केले.

मोवाड पूरग्रस्तांचे प्रश्न कायमच
प्रदीप आगलावे : प्रदीप गजभिये यांच्या पुस्तकाचे विमोचन
नागपूर : मोवाड पुराच्या घटनेला नुकतीच २५ वर्षे पूर्ण झाली. या पुराने शेकडो कुटुंबीयांचे होत्याचे नव्हते केले. नैसर्गिक प्रश्नांसह सामाजिक प्रश्नही या पुरामुळे निर्माण झाले होते. मात्र पुनर्वसनाचे नियोजन योग्य रीतीने न केल्यामुळे २५ वर्षानंतरही पूरपीडितांचे प्रश्न अद्याप कायम आहेत. प्रदीप गजभिये यांच्या पुस्तकाने पीडितांच्या प्रश्नांकडे पुन्हा लक्ष वेधल्याचे मनोगत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांनी व्यक्त केले.
डॉ. प्रदीप गजभिये यांच्या ‘पूरग्रस्त मोवाड : विस्थापन आणि पुनर्वसन’ या पुस्तकाच्या विमोचन समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक डॉ. गिरीश गांधी, पुस्तकावर भाष्य करण्यासाठी पत्रकार जयदीप हर्डीकर, सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे व साईनाथ प्रकाशनच्या संचालिका ललिता पुराणिक प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. प्रदीप आगलावे म्हणाले, विकास प्रकल्पग्रस्त किंवा नैसर्गिक आपत्ती पीडितांना केवळ मोबदला देऊन चालत नाही तर विस्थापितांचे दु:ख, वेदना समजून घेणे आवश्यक आहे. पीडितांच्या रोजगाराचा, शिक्षणाचा व राहण्याचा प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विकास प्रकल्प व नैसर्गिक आपत्ती पीडितांच्या पुनर्वसनाबाबत नियोजनाचे विचार मांडले होते. या विचारातून पूरग्रस्तांचे प्रश्न सरकारने सोडवावे, असे आवाहन डॉ. आगलावे यांनी केले.
जयदीप हर्डीकर यांनी विस्थापितांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाबाबत कोणत्याही सरकारकडून दुर्लक्ष के ल्या जात असल्याची टीका केली. आज देशभरात १० कोटीच्या वर लोक विकास प्रकल्पाचे विस्थापित आहेत. विकास प्रकल्प स्थापन केला जातो व तेथील लोकांना विस्थापित केले जाते. प्रकल्पाच्या २५-५० वर्षानंतरही विस्थापित स्थिरावले जात नाही. गावातील १०० एकराचे मालगुजार विस्थापनानंतर शहरात रिक्षाचालकांचे काम करीत असल्याची व्यथा त्यांनी सोदाहरण मांडली. नैसर्गिक आपत्ती जातधर्माचा विचार करीत नाही, मात्र आपत्तीचे निराकरण करताना अशा वायफळ गोष्टींना महत्त्व दिल्या जात असल्याची खंत हर्डीकर यांनी व्यक्त केली. विलास भोंगाडे यांनी गोसेखुर्द प्रकल्पाचे उदाहरण देत विस्थापितांना आपल्याच हक्कासाठी वर्षानुवर्षे का लढावे लागते, हा प्रश्न उपस्थित केला.
डॉ. गिरीश गांधी यांनी गजभिये यांचे पुस्तक संशोधनपर आणि अभ्यासासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगत पुस्तकाचा दुसरा टप्पा काढून मोवाड पूरपीडितांचे दु:ख मांडण्याचे आवाहन यावेळी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. दीपक पवार यांनी केले.(प्रतिनिधी)