गुणवत्ता ढासळली, सोयाबीन जपून ठेवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:19 IST2021-01-13T04:19:51+5:302021-01-13T04:19:51+5:30

शरद मिरे भिवापूर : काही खासगी कंपन्यांकडून एरवी निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा होत असल्यामुळे 'पेरलं ते उगवलं नाही' ...

Quality deteriorated, soybeans take care! | गुणवत्ता ढासळली, सोयाबीन जपून ठेवा!

गुणवत्ता ढासळली, सोयाबीन जपून ठेवा!

शरद मिरे

भिवापूर : काही खासगी कंपन्यांकडून एरवी निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांचा पुरवठा होत असल्यामुळे 'पेरलं ते उगवलं नाही' ही समस्या शेतकऱ्यांच्या पाचवीला पूजली आहे. त्यातच यावर्षी रोग व किडीचा प्रादुर्भाव त्यानंतर आलेल्या परतीच्या पावसाने सोयाबीनची गुणवत्ता ढासळली असून उत्पादन क्षमता खालावली. त्यामुळे पुढील खरीप हंगामात बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. त्यावर मात करण्यासाठी यावर्षी शेतातील उत्पादित सोयाबीन जपून ठेवण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

यावर्षी खरीपाच्या हंगामात शेतात सोयाबीनचे हिरवे पीक उभे होत असताना रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यानंतर सोयाबीन काढणीच्या अवस्थेत असताना परतीच्या पावसाने झोडपून काढले. त्यामुळे हातात आलेल्या सोयाबीनची गुणवत्ता ढासळली. उत्पादन क्षमता मंदावली आहे. महत्त्वाचे म्हणजे काही कंपन्यांचे बियाणे शेतात पेरणीपश्चात उगवण क्षमतेत ‘फेल’ ठरले. त्यामुळे खरेदी केलेले सोयाबीन बियाणे निकृष्ट दर्जाचे असल्याच्या तक्रारीसुद्धा वाढल्या. पुढील हंगामात सोयाबीन बियाण्यांची टंचाई निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.

अशात ज्या शेतकऱ्याकडे चांगले सोयाबीन आहे, त्यांनी ते बियाणे जतन करून ठेवावे. सोयाबीनच्या सर्वच जाती सुधारित असल्यामुळे दरवर्षी नवीन बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे ज्या शेतकऱ्याकडे सोयाबीन आहे, त्यांनी दर तीन महिन्याला घरच्याघरी उगवण क्षमता तपासून स्वत:ला आवश्यक असणारे व आपल्या स्वकीयांना लागणारे सोयाबीन राखून ठेवल्यास येणाऱ्या अडचणीवर मात करता येऊ शकते, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. दुसरीकडे गावातील शेतकऱ्यांना बाजारभावाने हे बियाणे विक्री केल्यास त्यांनाही मदत होणार आहे. ________________________________________

‌‌ बीजोत्पादनासाठी सोयाबीनची पेरणी

ज्या शेतकऱ्यांकडे सिंचन सुविधा व एक-दोन एकर शेत रिकामे आहे, त्यांनी ३० जानेवारीपर्यंत कमीतकमी एक एकर शेतात केवळ बीजोत्पादनासाठी सोयाबीनची पेरणी करावी. व्यवस्थित देखभाल केल्यास ३ ते ५‌ क्विंटल एकरी उत्पादन येऊ शकते. त्यातून चांगल्या दर्जाचे बियाणे उपलब्ध होऊ शकते. उन्हाळी सोयाबीनची उगवण क्षमता चांगली असल्याने खरीप हंगामामध्ये २२ ते २५ किलो एवढे एकरी सोयाबीन पेरणीकरिता लागेल. यातून उत्पादन खर्चात बचत होईल, असा विश्वास कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

२००‌ हेक्टर मध्ये बीजोत्पादन

पुढील हंगामात येणारी बियाण्यांची संभाव्य‌ टंचाई लक्षात घेता, तालुका कृषी विभागाने गत ऑक्टोबर महिन्यापासून सोयाबीन उत्पादक गावात 'ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम' राबविला आहे. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना बीजोत्पादनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. बीजोत्पादनासाठी कृषी विभागाने तालुक्यात ५०० हेक्टरचे नियोजन केले. त्यापैकी सद्यस्थितीत तालुक्यात २०० हेक्टरमध्ये उन्हाळी लागवड झाली आहे. तर उर्वरित ३०० हेक्टरचे उदिष्टसुद्धा पूर्ण करणार असल्याचा विश्वास तालुका कृषी अधिकारी राजेश जारोंडे यांनी व्यक्त केला. यातून बियाण्यांच्या टंचाईवर मात करता येणार आहे.

---

गत खरीपाच्या हंगामातील एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता, शेतकऱ्यांनी आतापासूनच सावध होणे आवश्यक आहे. बियाण्यांच्या संभाव्य टंचाईवर मात करण्यासाठी पुढील हंगामाची तयारी आतापासूनच करणे आवश्यक आहे. यादरम्यान शेतकऱ्यांना कुठलीही अडचण आल्यास, कृषी विभाग मार्गदर्शन व सहकार्यासाठी सज्ज आहे.

राजेश जारोंडे,

तालुका कृषी अधिकारी भिवापूर

Web Title: Quality deteriorated, soybeans take care!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.