लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे पुणे आणि रिवा दरम्यान नवीन एक्सप्रेस ट्रेन ३ ऑगस्टपासून धावणार आहे. विशेष म्हणजे ही ट्रेन नागपूर मार्गे जाणार असून दोन्ही राज्यांतील प्रवाशांना पर्यटन, शिक्षण व तीर्थयात्रेसाठी सहज प्रवासाची संधी मिळणार आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे स्थानकावरून या गाडीला हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे.
रेल्वे प्रशासनाने ही गाडी सुरू करताना विशेष दृष्टीकोन स्वीकारला आहे. पुणे आणि रिवा दोन्ही शहरे केवळ ऐतिहासिकच नव्हे, तर शैक्षणिक आणि धार्मिकदृष्ट्याही महत्वाची आहेत. पुणे हे एज्युकेशन हब आणि तीर्थक्षेत्रांसाठी प्रसिद्ध असून रिवा हे मध्यप्रदेशातील उभरते पर्यटन केंद्र मानले जाते. त्यामुळे या गाडीचा मार्ग केवळ प्रवासापुरता मर्यादित न राहता यातून सांस्कृतिक आणि शैक्षणिक दुवाही जोडला जाणार आहे.
असे आहे वेळापत्रक
ट्रेन नंबर २०१५१ पुणे–रिवा एक्सप्रेस दर गुरुवारी १५.१५ वाजता पुणे स्थानकातून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता रिवा स्थानकावर पोहोचेल. त्याचप्रमाणे ट्रेन नंबर २०१५२ रिवा–पुणे एक्सप्रेस दर बुधवारी ०६.४५ वाजता रिवा स्थानकातून प्रस्थान करेल आणि दुसऱ्या दिवशी ०९.४५ वाजता पुणे स्थानकावर पोहोचेल. ही गाडी दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, बालाघाट, नैनपूर, जबलपूर, कटनी आणि सतना या स्थानकावर थांबणार आहे.
येथे थांबणार गाडी
या गाड्या महाराष्ट्रातील दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, वर्धा, नागपूर आणि गोंदिया तसेच मध्यप्रदेशातील बालाघाट,नैनपुर, जबलपुर, कटनी, सतना आदी रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. या गाडीला २ वातानुकूलित द्वितीय श्रेणी, ३ वातानुकूलित तृतीय श्रेणी, ३ इकोनॉमी वातानुकूलित तृतीय श्रेणी, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसन व्यवस्था असलेला गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन असे एकूण २० कोच राहणार आहेत.