पुणे, मुंबईवारी "६० महागली !
By Admin | Updated: June 21, 2014 02:35 IST2014-06-21T02:35:46+5:302014-06-21T02:35:46+5:30
रेल्वे मंत्रालयाने प्रवासी भाड्यात १४.२ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून ...

पुणे, मुंबईवारी "६० महागली !
नागपूर : रेल्वे मंत्रालयाने प्रवासी भाड्यात १४.२ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून आगामी २५ जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना २५ जूनपासून भाडेवाढीचा सामना करण्याची पाळी येणार असून नागपूरवरून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मुंबईवारी ६० रुपयांनी महागली आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ‘अच्छे दिन आलेवाले है’ अशी अपेक्षा सर्व सामान्य नागरिकांना होती. परंतु सरकारच्या कार्यकाळाची सुरुवातीलाच रेल्वे प्रवाशांना भाडेवाढीला सामोरे जावे लागले असल्यामुळे हे कोणते ‘अच्छे दिन’ असा सवाल प्रवासी उपस्थित करीत आहेत. रेल्वे मंत्रालयाने घेतलेल्या निर्णयानुसार २५ जूनपासून रेल्वे प्रवासभाड्यात वाढ करण्यात येणार आहे. यात रेल्वे प्रवाशांना १४.२ टक्के भाडेवाढीनुसार प्रवासाचे तिकीट खरेदी करावे लागणार आहे. प्रवासभाड्यासोबतच रेल्वे मंत्रालयाने माल वाहतुकीवरही ६.५ टक्के वाढ केली आहे. रेल्वे मंत्रालयाला प्रवासी वाहतुकीतून हवे तेवढे उत्पन्न मिळत नाही. ही तूट रेल्वे मंत्रालय माल वाहतुकीच्या माध्यमातून भरून काढते. रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने रेल्वे मंत्रालयाने ही भाडेवाढ केल्याचे बोलले जात आहे. परंतु ते काही असो रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मात्र आता आपल्या खिशातून अतिरिक्त रक्कम मोजून प्रवासाचे तिकीट खरेदी करण्याची पाळी आली आहे. रेल्वे अर्थसंकल्पात प्रवास भाड्यात वाढ होईल, अशी अपेक्षा वर्तवण्यात येत होती. परंतु अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच रेल्वे मंत्रालयाने भाडेवाढ जाहीर करून सर्व प्रवाशांना धक्का दिला आहे.