Pulwama attack: पाकविरोधात संपूर्ण विदर्भात संतापाची लाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 21:51 IST2019-02-15T21:50:17+5:302019-02-15T21:51:14+5:30
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर विदर्भात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येकच जिल्ह्यात विविध संघटना तसेच नागरिकांकडून दहशतवादी तसेच दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानविरोधात निदर्शने करण्यात आली. यात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Pulwama attack: पाकविरोधात संपूर्ण विदर्भात संतापाची लाट
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर विदर्भात संतापाची लाट उसळली आहे. प्रत्येकच जिल्ह्यात विविध संघटना तसेच नागरिकांकडून दहशतवादी तसेच दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानविरोधात निदर्शने करण्यात आली. यात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी झाले होते.
नागपुरात सायंकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भारतीय जनता पक्षातर्फे निदर्शने करण्यात आली. यावेळी खा.विकास महात्मे, आ.सुधाकर कोहळे, आ.अनिल सोले इत्यादींच्या उपस्थितीत पाकिस्तानचा ध्वज जाळण्यात आला. नागपुरात जागोजागी निदर्शने करण्यात आली. नागपूरसोबतच चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, अकोला, वाशीम येथे देखील नागरिकांनी या हल्ल्याविरोधात आपला संताप व्यक्त केला. अनेक ठिकाणी उपस्थितांनी मौन पाळून शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. या भ्याड हल्ल्यामागे पाकिस्तानचाच हात असून दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी भारत सरकारने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केली. सोबतच काही जिल्ह्यात पाकिस्तानचा प्रतिकात्मक राष्ट्रध्वज तसेच पंतप्रधान इम्रान खान यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावत शहीद जवान अमर रहे अशाही घोषणा दिल्या. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संवेदनशील ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.