आयसोलेट असणाऱ्यांना दिले ‘पल्स ऑक्सिमीटर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 20:51 IST2020-09-21T20:49:55+5:302020-09-21T20:51:08+5:30
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अपुऱ्या वैद्यकीय व्यवस्थेमुळे रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात येत आहे. या रुग्णांना घरीच पल्स ऑक्सिमीटर पुरविण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत जिल्ह्यातील १८२० रुग्णांना ऑक्सिमीटरचा पुरवठा करण्यात आला आहे.

आयसोलेट असणाऱ्यांना दिले ‘पल्स ऑक्सिमीटर’
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. अपुऱ्या वैद्यकीय व्यवस्थेमुळे रुग्णांना गृहविलगीकरणात ठेवण्यात येत आहे. या रुग्णांना घरीच पल्स ऑक्सिमीटर पुरविण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत जिल्ह्यातील १८२० रुग्णांना ऑक्सिमीटरचा पुरवठा करण्यात आला आहे.
२० सप्टेंबरपर्यंत ग्रामीण भागामध्ये १२ हजार ७४३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ९,२५८ रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मातही केली आहे. तर सद्यस्थितीत ३,१२६ वर रुग्ण हे अॅक्टिव्ह आहेत. यापैकी बहुतांश रुग्णांना लक्षणे नसल्याने ते गृह विलगीकरणात उपचारार्थ आहेत. तर काही रुग्ण कोविड केअर सेंटर (सीसीसी) मध्ये तर काही रुग्णालयांमध्ये डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत आहे. सध्या जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील कोरोना संकट आता थोडे ओसरले असले तरी, नागपूर ग्रामीण, हिंगणा या तालुक्यात हे कोरोनाचे संकट अद्यापही कायमच आहे. यावर प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. वाढती रुग्णसंख्या व त्यातच अनेकांना लक्षणे नसतानाही त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह असल्याने अशांना आता गृह विलगीकरणातच ठेवण्यात येत आहे. त्यामुळे अशा रुग्णांनाच पल्स ऑक्सिमीटर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने ऑक्सिमीटर विकत घेतले आणि ग्रामीण भागातील रुग्णांना दिले जात आहेत. याद्वारे त्यांच्या प्रकृतीच्या अंदाज घेणे सोपे होत आहे. रुग्ण बरा झाल्यानंतर हे पल्स ऑक्सिमीटर त्याच्याकडून परत घेत ते निर्जंतुकीकरण करून, इतर रुग्णांना दिले जात आहे.
तालुकानिहाय वितरित करण्यात आलेले ऑक्सिमीटर
नागपूर (ग्रा.) १७०,कामठी २५०, हिंगणा २७५,रामटेक ५०,कुही ५०,नरखेड ५०,कळमेश्वर (टीएचओ) १५०,मौदा १००,भिवापूर ५०,उमरेड ५०,कळमेश्वर (आरएच) १५०,सावनेर २२५,पारशिवनी १५० आणि काटोल १००