सोशल प्लॅटफॉर्मवर सायकोचा हैदोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:08 IST2021-04-10T04:08:33+5:302021-04-10T04:08:33+5:30
नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सोशल प्लॅटफॉर्मवर मैत्री करून शाळा-कॉलेजमधील विद्यार्थिनी आणि नंतर त्यांच्या नातेवाईक महिला-मुलींचे फेक ...

सोशल प्लॅटफॉर्मवर सायकोचा हैदोस
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोशल प्लॅटफॉर्मवर मैत्री करून शाळा-कॉलेजमधील विद्यार्थिनी आणि नंतर त्यांच्या नातेवाईक महिला-मुलींचे फेक आयडी तयार करून अत्यंत आक्षेपार्ह मेसेज पाठविण्याचा विकृतपणा एका सायकोने चालविला आहे. त्याच्या या विकृतीमुळे सोशल प्लॅटफॉर्मवर सक्रिय राहणाऱ्या मुलीच नव्हे तर महिलांमध्येही प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
आधी तो सोशल प्लॅटफॉर्मवर फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवतो. ती ॲक्सेप्ट करताच त्या मुलीशी चॅटिंग आणि व्हिडिओ कॉल करून सलगी साधण्याचा प्रयत्न करतो. त्याचा विक्षिप्तपणा लक्षात आल्यामुळे अनेक जणी त्याला ब्लॉक करतात किंवा त्याच्याशी चॅट करणे थांबवतात. त्यामुळे हा सायको नंतर त्या मुलीचे अथवा महिलेचे फेक प्रोफाइल तयार करून तिच्या फ्रेण्डलिस्टमधील मित्र-मैत्रिणींना अत्यंत घाणेरडे मेसेज पाठवतो. या भामट्याने अशाप्रकारे अनेक मुली आणि तिच्या नातेवाईक महिला-मुलींसोबत असा विकृतपणा केला आहे. त्याच्या या विकृतीमुळे महिला तसेच मुलींमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.
अलीकडे फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲपसारखे संवादाचे माध्यम सोशल मीडियावर चांगलेच लोकप्रिय झालेले आहेत. प्राैढांपेक्षाही कितीतरी जास्त पटीने यावर कॉलेजिअन्सच्या उड्या पडतात. स्मार्टफोन वापरणारी मंडळी तर यावर फेविकॉलचा जोड लागल्यासारखी चिपकून असतात. काही क्षणांपूर्वी ज्याचे नाव, गाव, पत्ता माहिती नव्हता किंवा ज्याचे तोंडही बघितले नाही त्याला किंवा तिला फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवली किंवा ॲक्सेप्ट केली जाते. त्याचाच गैरफायदा काही विक्षिप्त मंडळी घेत आहेत.
इन्स्टाग्रामवर आदित्य राठोड अशा नावाची प्रोफाइल असलेल्या अशाच एका सायकोने सध्या सोशल प्लॅटफॉर्मवर सक्रिय असलेल्या महिला मुलींमध्ये प्रचंड दहशत निर्माण केली आहे. हा भामटा स्वत:ला गुजरातमधील रहिवासी सांगतो. आधी फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून ती ॲक्सेप्ट होताच तो त्या मुलीशी नको तशा भाषेत चॅटिंग करण्याचा प्रयत्न करतो. त्याने नागपूरसह ठिकठिकाणच्या अनेक विद्यार्थिनींना आपले लक्ष्य केले असून, त्याच्याशी चॅटिंग बंद केल्यानंतर त्याने मुलीची बहीण, आई आणि त्यांच्या संपर्कातील महिला-मुलींचे फेक आयडी बनवून अत्यंत लज्जास्पद असे मेसेज अनेकांना पाठविले आहेत. विशेष म्हणजे, त्या मुलीने आपल्याशी सलग चॅटिंग करावी, असाही अट्टाहास त्याने मुलीच्या मैत्रिणींना पाठविलेल्या मेसेजमधून मांडला आहे. कारण ज्या पद्धतीने तो मुलगी, तिची बहीण, आई आणि मैत्रिणींसह त्यांच्याही नात्यातील महिलांबद्दल मेसेज पाठवतो, ते प्रचंड संतापजनक आहेत. त्याच्या या विकृतीमुळे मुली आणि महिलाच नव्हे तर अनेक परिवार प्रचंड मनस्ताप सहन करीत आहेत.
कपिलनगरात गुन्हा दाखल
कपिलनगर पोलीस ठाण्यात या सायोकोविरुद्ध एक गुन्हा दाखल झाला आहे. सायबर सेलच्या माध्यमातून या सायकोचा पोलिसांनी शोध चालवला आहे. त्याचे नाव आदित्य राठोडच आहे आणि तो खरेच गुजरातचा आहे का, अशी शंका आहे. मात्र, त्याचा आम्ही लवकरच शोध लावू, असा विश्वास पोलीस अधिकारी व्यक्त करीत आहेत.
---