हत्या प्रकरणात हलगर्जी भोवली, इमामवाडा पोलिस ठाण्यातील पीएसआय निलंबित
By योगेश पांडे | Updated: April 9, 2025 23:14 IST2025-04-09T23:13:46+5:302025-04-09T23:14:14+5:30
पाच कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबवली.

हत्या प्रकरणात हलगर्जी भोवली, इमामवाडा पोलिस ठाण्यातील पीएसआय निलंबित
योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नरेश वालदे हत्या प्रकरणात निष्काळजीपणा करणाऱ्या इमामवाडा पोलिस ठाण्यातील एका उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. तर पाच कर्मचाऱ्यांची पगारवाढ थांबविण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात आलेली नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.
२६ मार्च रोजी दिवसाढवळ्या इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जाटतरोडी पोलिस चौकीसमोर ५२ वर्षीय नरेश वालदे यांची कुख्यात गुन्हेगार नितेश ऊर्फ नाना मेश्राम आणि ईश्वर ऊर्फ जॅकी सोमकुंवर यांनी हत्या केली. नाना बऱ्याच दिवसांपासून वालदे यांच्या मुलीला त्रास देत होता. २५ मार्चच्या रात्री त्याने आणि त्याच्या साथीदारांनी वालदे यांना मारण्याच्या उद्देशाने घरावर हल्ला केला होता. तलवारीने वार करून दरवाजा तोडण्यात आला. वालदे घरी नसल्याने त्यांची बाइक खराब केली आणि निघून गेला. नानाविरुद्ध आधीच खुनाचा गुन्हा दाखल होता. नाना आणि त्याचे साथीदार कुख्यात गुन्हेगार असूनही, इमामवाडा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. वालदे यांनी संपूर्ण रात्र पोलिस स्टेशनमध्ये काढली. त्यांनी कर्मचाऱ्यांकडून मदत मागितली आणि आरोपींना अटक करण्याची मागणी केली.
मात्र, डीबी पथकातील कर्मचाऱ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. यामुळे आरोपींचे मनोबल वाढले आणि त्यांनी पोलिस चौकीसमोरच वालदेंची हत्या केली. उपायुक्त रश्मिता राव यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. उपनिरीक्षक आडे त्या दिवशी नाइट ऑफिसर होते व त्यांनीच अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. गंभीर गुन्ह्यातील आरोपी असूनदेखील कारवाई न केल्याचा ठपका लावत आडे यांना निलंबित करण्यात आले आहे. तर पोलिस ठाण्यातील डीबी पथकातील तीन कर्मचारी, बिट मार्शल्स व एका कर्मचाऱ्याची पगारवाढ थांबविण्यात आली आहे. इतर अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई का करण्यात आलेली नाही, असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे.