‘सोशल मीडिया’तून चिथावणीखोर भाषणे ‘ट्रीगर’; गुन्ह्यांत ४५ टक्क्यांची वाढ

By योगेश पांडे | Updated: March 24, 2025 23:56 IST2025-03-24T23:56:14+5:302025-03-24T23:56:37+5:30

दंगली पेटविण्यासाठी समाजकंटकांची मोडस ऑपरेंडी : देशपातळीवर ‘सायबर स्टॉकिंग’देखील वाढीस

Provocative speeches 'trigger' from 'social media'; 45 percent increase in crimes | ‘सोशल मीडिया’तून चिथावणीखोर भाषणे ‘ट्रीगर’; गुन्ह्यांत ४५ टक्क्यांची वाढ

‘सोशल मीडिया’तून चिथावणीखोर भाषणे ‘ट्रीगर’; गुन्ह्यांत ४५ टक्क्यांची वाढ

नागपूर : नागपूरसारख्या शांतताप्रिय शहरात मागील आठवड्यात झालेल्या दंगली भडकविण्यात सोशल माध्यमांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आल्याची बाब समोर आली होती. मात्र, केवळ नागपूरच नव्हे तर देशपातळीवर अशा घटना वाढत आहेत. ‘सोशल मीडिया’तून चिथावणीखोर भाषणे ‘ट्रीगर’ करून समाजात विष पेरण्यावर असामाजिक तत्त्वांकडून भर देण्यात येत आहे. वर्षभरात अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये ४५ टक्क्यांहून अधिकची वाढ दिसून आली असून, सुरक्षायंत्रणांसमोरील आव्हानांमध्ये यातून वाढच झाल्याचे चित्र आहे.

‘लोकमत’ला ‘एनसीआरपी’कडून (नॅशनल क्राईम रेकॉर्डिंग पोर्टल) प्राप्त झालेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. लोकांना कायदा मोडायला भाग पाडणारी प्रक्षोभक भाषणे सोशल माध्यमांतून शेअर करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. यामुळे देशातील विविध भागांत दंगली पेटल्या. अशा प्रकारच्या चिथावणीखोर भाषणे देणाऱ्यांविरोधात २०२३ मध्ये ३ हजार ५९७ घटना उघडकीस आल्या. मात्र २०२४ मध्ये यात ४५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली व हा आकडा ५ हजार २५० वर पोहोचला. २०२१ सालापासून यात सातत्याने वाढ होत आहे. सायबर गुन्हा घडल्यावर तक्रार करणाऱ्यांची संख्या फारच कमी आहे. त्यातही एनसीआरपीवर येऊन तक्रार करणाऱ्यांचे प्रमाण आणखी कमी आहे.

जॉब फ्रॉड घटले, मात्र हॅकिंगमध्ये वाढ

ऑनलाइन माध्यमातून बेरोजगारांना संपर्क करून त्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण मधील काळात वाढीस लागले होते. मात्र आता असे फ्रॉड घटले आहेत; परंतु सोशल मीडिया प्रोफाइल्सच्या हॅकिंगमध्ये मात्र वाढ झाली आहे. २०२३ मध्ये हॅकिंगच्या ३३ हजार ७२३ घटना समोर आल्या होत्या. मात्र, २०२४ मध्ये एनसीआरपीकडे ३८ हजार २९५ प्रकरणांची नोंद झाली. जॉब फ्रॉडच्या घटनांमध्ये १३ हजार ७६४ वरून १० हजार ४६१ वर घट झाली.

फ्रेंडशिप स्वीकारताना सावध व्हा, फेक प्रोफाइल्सचा सुळसुळाट

फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर फेक प्रोफाइल्सचा सुळसुळाट झालेला आहे. मात्र, फारच कमी लोक तक्रार करण्यासाठी पुढे येतात. २०२३ मध्ये फेक प्रोफाइलबाबत ३० हजार २३४ तक्रारी एनसीआरपीकडे आल्या होत्या. मात्र, २०२४ मध्ये यात मोठी वाढ झाली व हा आकडा ३९ हजार ८४६वर पोहोचल्याचे दिसून आले.

सायबर स्टॉकिंग-सेक्टिंगची समस्या कामय

अनेक शहरांमधील महिला व तरुणींना सायबर स्टॉकिंग म्हणजेच सायबर पाठलाग तसेच सेक्स्टिंगच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. अद्ययावत तंत्रज्ञान असतानादेखील यावर अद्यापही नियंत्रण येऊ शकलेले नाही. २०२३ मध्ये सायबर स्टॉकिंग व सेक्स्टिंगच्या ३९ हजार ८० घटनांची नोंद एनसीआरपीकडे झाली होती. २०२४ मध्ये हा आकडा ३९ हजार ७७ इतका होता.

वर्षनिहाय आकडेवारी

प्रकार : २०२१ : २०२२ : २०२३ : २०२४
चिथावणीखोर भाषणे : २,३२० : ४,०९२ :३,५९७ : ५,२५०
प्रोफाइल हॅकिंग : १०,६५० : २६,२८८ : ३३,७२४ : ३८२९५
फेक प्रोफाइल : १५,८४३ : २३,६२६ : ३०,२३४ : ३९८४६
जॉब फ्रॉड : ७,५०४ : १०,२९२ : १३,७६४ : १०,४६१
सायबर स्टॉकिंग : २१,५८९ : ४४,२७० : ३९,०८० : ३९,०७७

Web Title: Provocative speeches 'trigger' from 'social media'; 45 percent increase in crimes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.