उमरेड कोविड सेंटरला व्हेंटिलेटरची सुविधा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:09 IST2021-04-27T04:09:11+5:302021-04-27T04:09:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : नूतन आदर्श महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये तीन दिवसात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकांची ...

उमरेड कोविड सेंटरला व्हेंटिलेटरची सुविधा द्या
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : नूतन आदर्श महाविद्यालयातील कोविड केअर सेंटरमध्ये तीन दिवसात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकांची ऑक्सिजन लेव्हल कमी होत असून, व्हेंटिलेटरची तातडीने गरज उद्भवताच ही सुविधा याठिकाणी नाही. यामुळे उमरेड कोविड सेंटरला व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
याबाबतची माहिती घेतली असता, याठिकाणी सध्या सहा डॉक्टर आणि सहा परिचारिका आपली सेवा देत आहेत. बहुतांश कोरोनाबाधित रुग्ण अन्य रुग्णालयात वा हॉस्पिटलमध्ये भरती होता न आल्यामुळे उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये नाइलाजाने औषधोपचारासाठी येत आहेत. अनेकांची ऑक्सिजन लेव्हल ५० ते ६० असल्यावर याठिकाणी भरती होत आहे. यामुळे मृत्यूसंख्या वाढल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सोमवारी (दि.२६) रात्री उशिरापर्यंत ३५ रुग्ण याठिकाणी भरती आहे. अगदी लगतच्याच खाटेवर औषधोपचार घेत असलेल्या रुग्णाच्या मृत्यूमुळे अन्य रुग्णांमध्ये भीती निर्माण होत आहे. ऑक्सिजनची सुविधा याठिकाणी आहे. अशावेळी व्हेंटिलेटरसाठी प्रयत्न झाल्यास काहींचे प्राण नक्की वाचविता येईल, असे बोलले जात आहे.
....
रात्री १० नंतर डॉक्टर नाही
उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये दिवसभर डॉक्टर उपलब्ध राहत असले तरी रात्री १० नंतर एकही डॉक्टर हजर राहत नाही. केवळ दोन परिचारिका रात्री मुक्कामी असतात. रात्री-अपरात्री रुग्ण गंभीर अवस्थेत असल्यास वा बाहेरून आल्यास योग्य उपचार मिळत नाही. या गंभीर बाबीकडे जाणिवेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
....
अधिकाऱ्यांचे जाणे-येणे
उमरेड तालुका अधिकारी डॉ. संदीप धरमठोक आणि ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. एस.एन. खानम दोघेही मुख्यालयी राहत नाहीत. नागपूर येथून सकाळी येणे आणि सायंकाळी नागपूरला परत जाणे, असा कार्यक्रम दोघांचाही असल्याचे बोलले जाते. अतिशय विदारक परिस्थिती असताना या दोन्ही अधिकाऱ्यांचे मुख्यालयी न राहणे यावर संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.