शेतकऱ्यांना चांगली आरोग्य सेवा मिळावी
By Admin | Updated: July 26, 2015 03:11 IST2015-07-26T03:11:13+5:302015-07-26T03:11:13+5:30
विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी वेळेवर चांगली व स्वस्त दरात आरोग्य सेवा मिळत नसल्याचे हेही एक कारण आहे.

शेतकऱ्यांना चांगली आरोग्य सेवा मिळावी
मुख्यमंत्री फडणवीस : अकॅडमी आॅफ मेडिकल सायन्सेसचा पदग्रहण सोहळा
नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या अनेक कारणांपैकी वेळेवर चांगली व स्वस्त दरात आरोग्य सेवा मिळत नसल्याचे हेही एक कारण आहे. आत्महत्या थांबविण्यासाठी आणि ग्रामीण भागात चांगल्या आरोग्य सोयी उपलब्ध करून देण्यासाठी सरकारसोबतच तज्ज्ञ डॉक्टर, आरोग्य संघटना, कार्पाेट्सला संयुक्त रुपाने प्रयत्न करावे लागतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
अॅकेडमी आॅफ मेडिकल सायन्सेसच्या (एएमएस) पदग्रहण सोहळा रविवारी पार पडला, त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला पाहुणे म्हणून एम्स. नवी दिल्लीचे पल्मोनरी मेडिसीन विभागाचे प्रमुख व पद्मश्री डॉ. आर. गुलेरिया, मुंबईचे प्रसिद्ध इन्टरवेंशनल कार्डियोलॉजिस्ट डॉ. डी. पहलाजानी, एएमएसचे नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. व्ही.एम. भालेराव, डॉ. राजू खंडेलवाल, पूर्व अध्यक्ष सुनील अंबुलकर, डॉ. हरीश वरभे, सचिव डॉ. निर्मल जयस्वाल उपस्थित होते. विशेष रुपाने डॉ. बी.जे. सुभेदार कार्यक्रमात सहभागी झाले होते.
फडणवीस म्हणाले, ज्या गतीने आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक तंत्रज्ञान व औषधे येत आहेत, त्या गतीने आरोग्य सेवा स्वस्त आणि सहज उपलब्ध झालेली नाही. भारत विकसनशिल देश आहे. यामुळे अर्थसंकल्पात कमी बजेटची तरतूद करणे शक्य नाही. ग्रामीण भागातील इस्पितळांमध्ये मनुष्यबळांची संख्या फार कमी आहे. ही दूर करण्यासाठी आरोग्य विभागातील डॉक्टरांच्या सेवानिवृत्तीचे वय वाढविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, ५०० डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहिरात देण्यात आली, परंतु २०० डॉक्टरच उपलब्ध होऊ शकले. सामाजिक बांधिलकी जोपासून ग्रामीण भागात, गोरगरीब व तळागाळातील लोकांना वैद्यकीय सेवा पुरवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
डॉ. गुलेरिया म्हणाले, रोज नवीन आषधे व तंत्रज्ञान येत आहे. यामुळे डॉक्टरांनी अपडेट राहणे आवश्यक झाले आहे. डॉ. पहलाजानी म्हणाले, नागपूरच्या आरोग्य क्षेत्रात कार्पाेरेट इस्पितळाची संस्कृति विकसीत झालेली नाही. यासाठी येथील डॉक्टर कौतुकाचे पात्र आहेत.
येथे दिल्ली, मुंबईसारखीच सेवा उपलब्ध आहे, असे म्हणून त्यांनी नव्या चमूला शुभेच्छा दिल्या. डॉ. भालेराव म्हणाले की, जग बदलत आहे,आपणासही बदलण्याची गरज आहे. यावेळी त्यांनी वर्षभरातील प्रस्तावित कार्यक्रम-उपक्रमांची माहिती दिली.
संचालन डॉ. कल्पना दाते व डॉ. राजेश बारोकर यांनी केले. आभार नवनियुक्त सचिव डॉ. निर्मल जायस्वाल यांनी मानले. (प्रतिनिधी)