काटोल : वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मोठ्या प्रमाणात बेड व सोबतच ऑक्सिजनची व्यवस्थाही लागणार आहे. नागपूर शहरातही बाधितांची संख्या मोठी आहे. त्यामुळे तेथील सुविधांवर अवलंबून न राहता काटोल व नरखेड येथेच रुग्णांना सर्व सुविधा उपलब्ध कराव्यात, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्या.
देशमुख यांनी शनिवारी काटोल आणि नरखेड तालुक्यातील कोरोना संक्रमण आणि प्रशासनाच्या वतीने रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला. दोन्ही तालुक्याच्या पंचायत समिती सभागृहात या बैठकींचे आयोजन करण्यात आले होते. तीत देशमुख ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, दोन्ही तालुक्यातील तहसीलदार, पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस अधिकारी, नगराध्यक्ष तसेच जिल्हा परिषद तथा पंचायत समिती सदस्य व पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
काटोल आणि नरखेड तालुक्यात कोराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. यावर वेळीच आळा घातला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता त्यांनी वर्तविली. यासाठी राज्य शासनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. यासोबतच प्रशासनाने याची योग्य अंमलबजावणी करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. या दोन्ही तालुक्यात कोविड लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी पुढाकार घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.