कळमना येथे रस्त्यासाठी महात्मा गांधींच्या प्रतिमेसह निदर्शने
By मंगेश व्यवहारे | Updated: October 3, 2023 21:17 IST2023-10-03T21:16:01+5:302023-10-03T21:17:27+5:30
नागरिकांनी गांधी जयंतीला महात्मा गांधीजींची प्रतिमा घेऊन चिखलमय रस्त्यावर प्रतिकात्मक निदर्शने केली.

कळमना येथे रस्त्यासाठी महात्मा गांधींच्या प्रतिमेसह निदर्शने
मंगेश व्यवहारे, नागपूर : उत्तर नागपुरातील कळमना परिसरातील नागराजनगर येथील कल्लन शाळेसमोरील कच्चा रस्त्यास दर पावसाळ्यात तलावाचे रूप प्राप्त होत असल्याने विद्यार्थ्यांना तसेच परिसरामधील रहिवाशांना चिखल आणि घाण पाण्यातून ये-जा करावी लागते. या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांनी गांधी जयंतीला महात्मा गांधीजींची प्रतिमा घेऊन चिखलमय रस्त्यावर प्रतिकात्मक निदर्शने केली.
शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व पुरुषांनी एकत्र येऊन प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला.
यावेळी शैलेंद्र वासनिक, शीला सपकाळे, छाया उईके, प्रशांत चावरे, सुहासिनी बागडे, वंदना जांभुळे, लता दाबेकर, राधिका मालाधरे, महिमा काशीकर, रेशम इनवाते, विभा सोनचित्ते, कमल चावरे, रेहाना नसीम सलमानी, रेशम काशीकर उपस्थित होते. कल्लन शाळेसमोरील पक्क्या रस्त्याच्या कामासाठी नागराज नगर विकास समिती व शहर विकास मंचच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांच्या सह्यांसह अनेक निवेदने महापालिकेला देण्यात आली आहेत. याची दखल घेत मनपाच्या स्लम विभागाने प्रस्तावही तयार केला आहे, परंतु आयुक्तांकडे तो प्रस्ताव मागील महिन्यांपासून प्रलंबित आहे. पक्का रस्ता नसल्याने या पावसाळ्यात विद्यार्थी व नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो आहे.