४९ प्रस्तावांना महिनाभरात मान्यता द्या
By Admin | Updated: April 6, 2017 02:28 IST2017-04-06T02:28:33+5:302017-04-06T02:28:33+5:30
जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचे ४९ प्रस्ताव महिनाभरात शासनाकडे सादर करून मान्यता घेऊन, निविदा प्रक्रिया पूर्ण

४९ प्रस्तावांना महिनाभरात मान्यता द्या
पाणीपुरवठा मंत्री लोणीकर यांचे जि.प.ला निर्देश : मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेची बैठक
नागपूर : जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेचे ४९ प्रस्ताव महिनाभरात शासनाकडे सादर करून मान्यता घेऊन, निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी नागपूर जिल्हा परिषदेला दिले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ही बैठक मुंबईच्या मंत्रालयात पार पडली.
जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे असलेल्या पाणीपुरवठा योजनांचा आढावा या प्रसंगी घेण्यात आला. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनांच्या ४९ प्रस्तावांपैकी २५ प्रस्ताव नागपूर जि.प.ने नुकतेच शासनाकडे सादर केले. असे असले तरी सर्व प्रस्ताव महिनाभरात शासनाकडून मंजूर करवून घेण्याचे निर्देश याच बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जि.प.च्या सीईओ कादंबरी भगत यांना दिले. बैठकीला आमदार समीर मेघे, प्रकाश गजभिये, मल्लिकार्जून रेड्डी, सुधाकर देशमुख, अनिल सोले, कृष्णा खोपडे,नागो गाणार,गिरीश व्यास, पाणीपुरवठा विभागाचे सचिव राजेशकुमार, म.जि.प्रा.चे लांडगे व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनांपैकी ५ कोटी खर्चापेक्षा जास्त रकमेच्या योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे असून अशा १० पैकी ४ योजनांचे प्रस्ताव शासनाकडे अजून पाठवायचे आहेत. ते महिनाभरात शासनाला पाठवावे, असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री व पालकमंत्री यांनी संयुक्तपणे दिले.
समीर मेघे यांनी टाकळघाट, नीलडोह, डिगडोह, बुटीबोरी येथील पाणीपुरवठा योजनांच्या समस्या दूर करुन योजना लवकर सुरू करण्याची सूचना केली.
कोंढाळीची योजना ८ वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे या योजनेवरील खर्च वाढला आहे. ३.५ कोटी रुपये अतिरिक्त खर्च करुन ही योजना लवकर पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले. पारशिवनी पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.
पण ग्रामपंचायतीने योजना हस्तांतरित न करून घेतल्याने व या योजनेवर निधी उपलब्ध नसल्यामुळे पाणीपुरवठा थांबवण्यात आला. ५.५ कि.मी.ची नवीन पाईप लाईन टाकण्याची गरज आहे. रामटेक पाणी पुरवठा योजनेमध्ये गळतीचे प्रमाण अधिक आहे. बऱ्याच ठिकाणी पाईप फुटली आहे.
नवीन पाईपलाईन टाकण्याची गरज असून त्यासाठी लागणाऱ्या ३.५ ते ४ कोटीची मागणी रेड्डी यांनी केली.(प्रतिनिधी)
महापालिकेच्या २४ बाय ७ योजनेचा घेणार आढावा
नागपूर पेरीअर्बन पाणी पुरवठा योजनेची कामे १० गावांमध्ये सुरु झाली असून ८५ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. या महिना अखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण होतील. बिडगाव-तरोडी योजना १२.५ कोटीची आहे. मुख्यमंत्री पेयजल कार्यक्रमांतर्गत भिलगाव, लावा-सुराबर्डी, बोखारा या तीन पाणीपुरवठा योजना जलस्वराज्य-२ अंतर्गत घेण्यात येणार आहे. पेरी अर्बनच्या सर्व गावातील योजना १५ जूनपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. तसेच कामठी शहराचे पाणीपुरवठ्यासाठी तीन झोन तयार करण्यात येणार आहे. याचवेळी नागपूर शहराच्या पाणीटंचाई व २४ बाय ७ योजनांचा आढावा घेण्यासाठी १० तारखेला नागपुरात बैठक घेण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.
अल्पमुदती निविदा काढा
पाणी टंचाईच्या योजनांच्या कामांसाठी जि.प. व म.जि.प्रा. ने अल्प मुदती निविदा काढण्यास पाणीपुरवठा विभागाने मान्यता दिल्याचे सचिव राजेश कुमार यांनी बैठकीत सांगितले. यापूर्वीच ही मान्यता दिली होती. लवकरच जि.प. व म.जि.प्रा.ला लेखी पत्र पाठविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.