गंगाजमुना चिखलीत नेण्याचा होता प्रस्ताव
By Admin | Updated: February 8, 2015 01:17 IST2015-02-08T01:17:22+5:302015-02-08T01:17:22+5:30
गंगाजमुनातील ‘रेड लाईट एरिया’वर ग्वाल्हेर भागातून आलेल्या लोकांचाच अधिक वरचष्मा आहे. हा भाग चिखलीत नेण्याचा शासनाचा प्रस्ताव होता. परंतु या प्रस्तावाला ग्वाल्हेरच्याच

गंगाजमुना चिखलीत नेण्याचा होता प्रस्ताव
१९८० मध्ये झाले होते आंदोलन : ग्वाल्हेरच्याच लोकांचा विरोध
राहुल अवसरे - नागपूर
नागपूर : गंगाजमुनातील ‘रेड लाईट एरिया’वर ग्वाल्हेर भागातून आलेल्या लोकांचाच अधिक वरचष्मा आहे. हा भाग चिखलीत नेण्याचा शासनाचा प्रस्ताव होता. परंतु या प्रस्तावाला ग्वाल्हेरच्याच लोकांनी विरोध केला होता. कालांतराने हा प्रस्तावच बारगळला, अशी जाणकार सूत्रांची माहिती आहे. वस्ती हटाव आंदोलन १९८० मध्ये वारांगनांची ही वस्ती हटविण्यासाठी सर्वपक्षीय मोठे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांना कोणतेही पाठबळ नसल्याने हे आंदोलन काही नेत्यांनी दडपले होते. या वस्तीला वारंवार विरोध होत राहिल्याने ही वस्ती चिखली भागात स्थानांतरित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. वारांगनांच्या विरोधाला काही नेत्यांचा पाठिंबा असल्याने प्रस्ताव तसाच राहिला. पुढे पुनर्वसन म्हणून हा भाग चिखलीत नेल्यास या व्यवसायाला कायदेशीर स्वरूप प्राप्त होईल. ही चूक शासनाच्या लक्षात येताच हा प्रस्ताव कायमचा बारगळला.
तेव्हा वारांगनांच्या मुलींनाही लागायची हळद
पूर्वी रेड लाईट एरियात केवळ छत्तीसगड आणि ओडिशातील वारांगनाच देहव्यवसाय करायच्या त्यांच्या मुली लग्न होऊन नांदायला जायच्या. पुढे या वस्तीत मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील वारांगना आणि दलाल आले. ग्वाल्हेरपासून १०-१५ कि.मी. अंतरावर असलेल्या रेशीमपुरा आणि बदनापुरा भागात हा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. परंपरेनुसार हा धंदा चालतो. भाऊ बहिणीकडून, पती पत्नीकडून, आई-वडील मुलीकडून हा व्यवसाय करवून घेतात. लहान मुलींची खरेदी-विक्री होते, अशीही या सूत्रांची माहिती आहे.
मुलींचे लग्नच जुळत नव्हते
या वस्तीत सर्वसामान्य जीवन जगणारे लोकही राहत होते. परंतु वस्तीत चालणाऱ्या देहव्यवसायामुळे मुलींचे लग्नच जुळत नव्हते. जुळलेले लग्न तुटत होते. लग्नाची मोठी समस्या निर्माण होत होती. पुढे देहव्यापारातील लोकांची दादागिरी वाढून मोहल्ल्यातील लोकांसोबत हाणामाऱ्या व्हायच्या.
ग्वाल्हेरचे प्राबल्य
१९८० पूर्वी एका पोलीस अधिकाऱ्याने धाडीची कारवाई तीव्र केली आणि ग्वाल्हेर भागातील अर्धेअधिक लोक पळून जाऊन गंगाजुमानात स्थायिक झाले. अल्पवयीन मुलींनाही या धंद्यात गुंतवून त्यांनी मोठ्या प्रमाणावर हा धंदा सुरू केला व पाहता पाहता ते मालामाल झाले. त्यांच्या धंद्याला कंटाळून स्थानिक सामान्य रहिवाशांनी मिळेल त्या भावात आपली घरेदारे विकली. आता या ठिकाणी वारांगनांचे मोठमोठे इमले आहेत. ग्वाल्हेरकडील लोकांच्या प्राबल्यामुळे छत्तीसगडी आणि ओडिशातील वारांगनांची संख्याही कमी झाली. ग्वाल्हेर भागातून आलेल्या वारंगनांच्या फैलावलेल्या या धंद्यामुळे सामान्यांनी जीवन जगणे मुश्कील होऊन हे आंदोलन केले होते. पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्या कडक कारवाईमुळे येथील रहिवाशांच्या जुन्या आंदोलनाला उजाळा मिळालेला आहे.