५८ लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:10 IST2021-02-09T04:10:34+5:302021-02-09T04:10:34+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : पाेलिसांनी कामठी शहरातील भाजीमंडी परिसरात कारवाई करीत गुरांचे मांस व कातडीची अवैध वाहतूक करणारे ...

५८ लाखांचा मुद्देमाल जप्त
लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पाेलिसांनी कामठी शहरातील भाजीमंडी परिसरात कारवाई करीत गुरांचे मांस व कातडीची अवैध वाहतूक करणारे दाेन ट्रक पकडले. यात तिघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एकूण ५८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी (दि. ६) रात्री ११ वाजताच्या सुमारास करण्यात आली.
शहनाज अब्दुल गणी कुरेशी (३०, रा. भाजीमंडी, कामठी), नौशाद ऊर्फ कालू अहमद मोहम्मद जमील (४२, रा. वारीसपुरा, कामठी) व मोहम्मद जमील मोहम्मद शाहीद अन्सारी (२७, रा. बाबुपूर, कानपूर, उत्तर प्रदेश) अशी अटकेतील आराेपींची नावे असून, यात दाेन ट्रकचालक व एका ट्रक मालकाचा समावेश आहे. कामठी (जुनी) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना शहरातील भाजीमंडी परिसरातून गुरांच्या मांसाची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी या भागाची पाहणी करीत एमएच-४०/बीएल-८४९२ व युपी-७८/सीएल-३७३४ क्रमांकाचे दाेन ट्रक थांबवून झडती घेतली.
त्या ट्रकमध्ये गुरांचे प्रत्येकी १७ टन मांस व कातडी आढळून आली. ती विनापरवानगी वाहतूक असल्याचे स्पष्ट हाेताच पाेलिसांनी ट्रकचालकांसह मालकास अटक केली आणि त्यांच्याकडून प्रत्येकी २० लाख रुपये किमतीचे दाेन ट्रक व १८ लाख रुपये किमतीचे त्यातील साहित्य असा एकूण ५८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई दुय्यम पोलीस निरीक्षक रामदास पाटील, युनुस शेख, उपनिरीक्षक एन. कार्वेकर, विनोद धोंगडे यांच्या पथकाने केली.