शिक्षकांच्या ‘इनोव्हेशन’ला प्रोत्साहन
By Admin | Updated: February 10, 2015 00:52 IST2015-02-10T00:52:30+5:302015-02-10T00:52:30+5:30
‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विभागांमध्ये संशोधनाप्रति उत्साह दिसून येत आहे. ‘मिशन इनोव्हेशन’अंतर्गत विद्यापीठाने

शिक्षकांच्या ‘इनोव्हेशन’ला प्रोत्साहन
‘पायलट प्रोजेक्टस्’ला देणार बळ : एक लाखापर्यंत निधी देणार
नागपूर : ‘इंडियन सायन्स काँग्रेस’मध्ये सहभागी झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विभागांमध्ये संशोधनाप्रति उत्साह दिसून येत आहे. ‘मिशन इनोव्हेशन’अंतर्गत विद्यापीठाने ‘इनोव्हेटिव्ह रिसर्च अॅक्टीव्हीटी’चे प्रारूप तयार केले आहे. त्यानुसार विद्यापीठातील विभाग व संलग्नित महाविद्यालयांतील शिक्षकांनी जास्तीतजास्त प्रमाणात संशोधनाकडे वळावे याकरिता आर्थिक मदत करण्याची तरतूद यात करण्यात आली आहे. विशेषत: प्राथमिक स्वरूपाचे संशोधन किंवा ‘पायलट प्रोजेक्टस्’ला या माध्यमातून प्रोत्साहन देण्यात येणार आहे. विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या शिक्षकांना याअंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचा निधी मिळू शकणार आहे.
नागपूर विद्यापीठातील विभाग व महाविद्यालयांत संशोधन हवे त्याप्रमाणात होत नाही, अशी नेहमी ओरड करण्यात येते. परंतु हे वातावरण बदलावे यासाठी विद्यापीठाने पावले उचलली आहेत. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांमध्ये देखील संशोधन वाढीस लागावे, यासाठी योजना तयार करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या बाराव्या पंचवार्षिक योजनेच्या अंतर्गत प्रशासनाने संशोधनाला प्रोत्साहन देणाचा निर्णय घेतला आहे. या योजनेंतर्गत विद्यापीठाचा कुठलाही विभाग किंवा संलग्नित महाविद्यालयांतील पूर्णवेळ शिक्षक प्रस्ताव सादर करू शकतात. विद्यापीठाने २० फेब्रुवारीपर्यंत शिक्षकांकडून प्रस्ताव मागविले आहेत.
शिक्षकांकडून अर्ज आल्यानंतर तज्ज्ञ समितीकडून छाननी करण्यात येईल. त्यानंतर निवडण्यात आलेल्या उमेदवारांना समितीसमोर सादरीकरण करावे लागणार आहे व यानंतर विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. (प्रतिनिधी)
कला, वाणिज्यसाठी ५० हजार
‘इनोव्हेटिव्ह रिसर्च अॅक्टीव्हीटी’अंतर्गत शिक्षकांच्या प्राथमिक स्तरावर असलेले संशोधन, ‘पायलट प्रोजेक्ट’वर सुरू असलेले संशोधन यासंदर्भात मदत करण्यात येणार आहे. शिवाय ‘इन्स्ट्रुमेंट्र डेव्हलमेंट’, ‘लॅब टेस्टिंग’ इत्यादीसाठी शिक्षक याअंतर्गत प्रस्ताव पाठवू शकतात, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. याअंतर्गत विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, गृहविज्ञान, औषधीविज्ञानशास्त्र शाखेच्या शिक्षकांसाठी संशोधनासाठी एक लाखापर्यंतची मदत करण्यात येणार आहे. तर कला, वाणिज्य, सामाजिक विज्ञान, विधी व शिक्षण शाखेच्या शिक्षकांना विविध प्रकारच्या संशोधन प्रकल्पांसाठी ५० हजार रुपयांपर्यंतचे आर्थिक साहाय्य करण्यात येणार आहे.