नियम गुंडाळून संचालकांच्या नातेवाईकांना पदोन्नती; महापालिका कर्मचारी सहकारी बँकेतील प्रकार
By गणेश हुड | Updated: November 8, 2023 19:02 IST2023-11-08T19:02:01+5:302023-11-08T19:02:16+5:30
अध्यक्षांसह माजी संचालकांच्या नातेवाईकांचा समावेश असल्याचा खातेदारांचा आरोप

नियम गुंडाळून संचालकांच्या नातेवाईकांना पदोन्नती; महापालिका कर्मचारी सहकारी बँकेतील प्रकार
नागपूर : महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँकेने मागील काही वर्षात प्रथमच भागधारकांना डिव्हीडंट वाटप केला नाही. दुसरीकडे २० ते २५ वर्षापासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना डावलून चार-पाच वर्षापूर्वी लागलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. यात विद्यमान अध्यक्षांसह माजी संचालकांच्या नातेवाईकांनाचा समावेश आहे. आधिच २०१८ मधील अवैध भरतीचे प्रकरण न्यायालयात असताना या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ कसा दिला असा सवाल बँकेचे भागधारक दीपक मोहन स्वामी यांनी केला आहे.
२०१८ मध्ये बँकेत कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. यात तत्कालीन संचालकांच्या नातेवाईकांची प्रामुख्याने निवड करण्यात आली. यात विद्यमान अध्यक्ष ईश्वर मेश्राम यांचा मुलगा शुभम मेश्राम, माजी संचालक दिलीप देवगडे, वसंत पाटील, राधेश्याम निमजे, राजेंद्र ठाकरे, विजय काथवटे, विठ्ठल क्षीरसागर यांच्यासह अन्य संचालकांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. बँकेत प्रामुख्याने पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांची निवड करण्यात आली होती. या विरोधात काही भागधारक न्यायालयात गेले आहेत. प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही पदोन्नती देण्यात आल्याचा आरोप दीपक स्वामी यांनी केला आहे. बँकेत मागील २५ ते ३० वर्षापासून कार्यरत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतून वगळून नवीन कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. दोन वर्षापूर्वी या बँकेतील संगणक घोटाळा गाजला होता. यात शासनाचा लाखो रुपयांचा जीएसटी बुडाला होता. काही दिवसापूर्वी विशेष सभेत सदस्यांनी बॉयलाजनुसार बँकेचे कामकाज चालत नसून अध्यक्षांच्या मर्जीनुसार कारभार सुरू आहे. अधिकार नसतानाही नवीन समित्यांची नियुक्ती केल्याचा आरोप सदस्यांनी केला होता.
सहा वर्षापासून पदोन्नती दिली नव्हती
मनपा कर्मचारी सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांना मागील सहा वर्षात पदोन्नती मिळाली नव्हती. त्यामुळे सेवाज्येष्ठता व शैक्षणिक पात्रता विचारात घेवून पदोन्नती देण्यात आली आहे. बँकेत भरती प्रक्रीया ऑनलाईन पध्दतीने राबविण्यात आली होती. यात उत्तीर्ण झालेल्यांची निवड करण्यात आली.
-ईश्वर मेश्राम, अध्यक्ष, मनपा कर्मचारी सहकारी बँक
पदोन्नती नियमानुसारच
नियमानुसार सेवा ज्येष्ठता व उद्दीष्ट पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. बँकेत आर्थिक व्यवहार होतात. आरोपामुळे त्यावर परिणाम होतो. ही सहकारी बँक आहे. सहकाराच्या तत्वावर कामकाज चालते.
-मनिष बोडखे, मुख्यकार्यकारी अधिकारी, कर्मचारी सहकारी बँक