राष्ट्रप्रेमाने प्रेरित युवकांमुळेच देशाची प्रगती
By Admin | Updated: November 23, 2015 02:36 IST2015-11-23T02:36:12+5:302015-11-23T02:36:12+5:30
राष्ट्रप्रेमाने प्रेरित युवकांमुळेच देश प्रगती करीत असतो. त्यामुळे देशात असे राष्ट्रप्रेमाने प्रेरित युवक जास्तीतजास्त तयार होण्याची गरज आज सर्वाधिक आहे.

राष्ट्रप्रेमाने प्रेरित युवकांमुळेच देशाची प्रगती
देवेंद्र फडणवीस : अभाविपच्या विदर्भ कार्यालयाचे उद्घाटन
नागपूर : राष्ट्रप्रेमाने प्रेरित युवकांमुळेच देश प्रगती करीत असतो. त्यामुळे देशात असे राष्ट्रप्रेमाने प्रेरित युवक जास्तीतजास्त तयार होण्याची गरज आज सर्वाधिक आहे. कारण भारत हा सर्वाधिक तरुणांची संख्या असलेला देश आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या(अभाविप)‘छात्रचेतना भवन’ हे विदर्भ विभागीय कार्यालय आनंद टॉकीजसमोर सीताबर्डी येथे तयार करण्यात आले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन अंजनगाव सुर्जी येथील श्री देवकीनाथ मठाचे पीठाधीश आचार्य जितेंद्रनाथ महाराज यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. त्याप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी खा. अजय संचेती, अभाविपचे राष्ट्रीय संघटन मंत्री सुनील आंबेकर, राष्ट्रीय महामंत्री श्रीहरी बोरीकर, सुरेंद्र नाईक, प्रा. केदार ठोसर, गौरव हरडे, प्रा. सचिन रणदिवे व्यासपीठावर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, विद्यार्थ्यांचे संघटन हे राष्ट्र उभारणीसाठी असते. ज्ञानासोबतच चारित्र्य घडविल्याशिवाय ते शक्य नाही. वैयक्तिक ध्येयाचा पाठपुरावा करीत असताना राष्ट्रीय ध्येयाची भावना निर्माण होत नाही, तोपर्यंत राष्ट्र प्रगती करीत नाही. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रप्रेमाने प्रेरित विद्यार्थी तरुण घडविण्याचे कार्य करीत आहे. मी सुद्धा याच अभाविपमधून घडलो आहे. त्यामुळे या ठिकाणी मी एक मुख्यमंत्री म्हणून आलो नसून, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा एक कार्यकर्ता म्हणून आलो असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
जितेंद्रनाथ महाराज म्हणाले, देव, धर्म आणि देश ही एक विचारधारा घेऊन काम करणारी व्यक्ती कधीच अपयशी होत नाही. देश, समाज आणि धर्म अशा प्रत्येक क्षेत्रात काम करणारे नेतृत्व घडविण्याचे काम अभाविप करीत आहे. अभाविपच्या माध्यमातून रामभाऊ म्हाळगी प्रबोधनासारखी संस्था या नागपुरातच तयार व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. खा. अजय संचेती, श्रीहरी बोरीकर, सुनील आंबेकर यांनीही आपले विचार व्यक्त केले.
याप्रसंगी छात्रचेतना या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. प्रफुल्ल आकांत यांनी प्रास्ताविक केले. शुभांगी नक्षिणे यांनी संचालन केले. याप्रसंगी ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आ. अनिल सोले, मा. गो. वैद्य, प्रमिलाताई मेढे, शांताक्का, श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)