उत्तम मेटॅलिक्सचे उत्पादन चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:09 IST2021-02-13T04:09:28+5:302021-02-13T04:09:28+5:30
नागपूर : वर्धाजवळील उत्तम मेटॅलिक्सच्या भूगांव प्रकल्पातील दुर्घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत उत्पादन तत्काळ थांबवावे, असे आदेश औद्योगिक सुरक्षा व ...

उत्तम मेटॅलिक्सचे उत्पादन चौकशी पूर्ण होईपर्यंत थांबवावे
नागपूर : वर्धाजवळील उत्तम मेटॅलिक्सच्या भूगांव प्रकल्पातील दुर्घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत उत्पादन तत्काळ थांबवावे, असे आदेश औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय नागपूरने दिले आहेत.
उत्तम मेटॅलिक्स पश्चिम भारतातील सर्वांत मोठी कोल्ड-रोल्ड-स्टील आणि गॅल्व्हनाईज्ड स्टील उत्पादक कंपनी आहे. या प्रकल्पात काही दिवसांपूर्वी दुर्घटना होऊन ३८ कामगार होरपळल्याने जखमी झाले होते. १८ जण नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.
या घटनेची पाहणी आणि चौकशी करण्यासाठी राज्याच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय नागपूरचे उपसंचालक पल्लवी गंपावार यांनी अधिकाऱ्यांसोबत ७ फेब्रुवारीला प्रकल्पाला भेट दिली होती. त्यांनी उत्तम मेटॅलिक्सच्या व्यवस्थापनाला सुरक्षेचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. दुर्घटनेसाठी कारणाभूत ठरलेल्या विविध बाबी आणि तांत्रिक बाबींची माहिती घेऊन सर्वसमावेशक अहवाल राज्य शासन आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्या लवकरच सादर करणार आहेत. त्यापूर्वी राज्याचे मंत्री सुनील केदार आणि बच्चू कडू यांनी प्रकल्पाला भेट आणि चौकशीचे आदेश दिले होते. या दुर्घटनेची तत्काळ चौकशी करून उत्तम मेटॅलिक्सच्या व्यवस्थापनाविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते.