‘आॅनलाईन’ प्रक्रियेने घेतला वेग
By Admin | Updated: June 26, 2014 00:51 IST2014-06-26T00:51:57+5:302014-06-26T00:51:57+5:30
तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेला यंदा विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांतच ‘आॅनलाईन’ प्रक्रियेने वेग

‘आॅनलाईन’ प्रक्रियेने घेतला वेग
अभियांत्रिकी प्रवेश : तीन दिवसांत पाच हजारांहून अधिक अर्ज सादर
नागपूर : तंत्रशिक्षण संचालनालयाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी प्रवेशप्रक्रियेला यंदा विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. तीन दिवसांतच ‘आॅनलाईन’ प्रक्रियेने वेग घेतला आहे. आतापर्यंत निरनिराळ्या ‘एआरसी’तून (अप्लिकेशन रिसिप्ट सेंटर) जवळपास १२ हजार ‘अप्लिकेशन किट’ विकल्या गेल्या असून ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी भरून त्याचे सत्यापनदेखील केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर विभागातील ५७ अभियांत्रिकी महाविद्यालयातील २४,३९२ जागांसाठी २३ जूनपासून प्रवेशप्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दिवशी जरी ‘एआरसी’मध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी मंगळवारपासून जवळपास सगळीकडेच गर्दी दिसून येत आहे. आतापर्यंत ४१ ‘एआरसी’मधून ११,९२५ विद्यार्थ्यांनी ‘अप्लिकेशन किट’ घेतल्या आहे. यात खुल्या गटातील २,४०१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. ‘आॅनलाईन’ अर्ज भरून त्याचे सत्यापन करणे व कागदपत्रांची पडताळणी करण्याची अखेरची तारीख ३ जुलै आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी फारसा विलंब न लावता प्रक्रिया पूर्ण केली आहे. ३ दिवसांत ५,३८५ विद्यार्थ्यांनी ‘एआरसी’तून अर्जांचे सत्यापन केले असल्याचे समजते. (प्रतिनिधी)
गुण नव्हे ‘पर्सेंटाईल’ पाहणार
यंदाच्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेदरम्यान ‘जेईई-मेन्स’ व बारावीच्या गुणांच्या आधारावर प्रवेश देण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले होते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, सीबीएसई, आयसीएसई या निरनिराळ्या परीक्षांचे मूल्यांकन ‘आयएसआय’, कोलकाता (इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट) यांनी ठरविलेल्या ‘नॉर्मलाईज पर्सेंटाईल’ पद्धतीनुसार करण्याचे सुचविण्यात आले होते. विविध परीक्षा मंडळातील विद्यार्थ्यांचे इयत्ता बारावीतील फिजिक्स, केमेस्ट्री व मॅथमॅटिक्स या विषयांतील गुणांचे मूल्यांकन करण्याच्या प्रक्रियेस नॉर्मलाईझेशन असे संबोधतात. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाने समिती गठित केली होती. या समितीने पर्सेंटाईल काढताना ८ डेसिमलपर्यंत ‘पर्सेंटाईल’ काढण्यात यावे, असे सुचविले होते. त्यानुसार आता ‘जेईई मेन्स’मधील गुणांचे ‘पर्सेंटाईल’ व बारावीच्या गुणांच्या ‘पर्सेंटाईल’ला प्रत्येक ५० टक्के महतमाप देण्यात येणार आहे. या दोन्ही परीक्षेतील ‘पर्सेंटाईल’नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार आहे.