मतिमंदांच्या समस्या ही सामाजिक जबाबदारी

By Admin | Published: July 27, 2015 04:23 AM2015-07-27T04:23:06+5:302015-07-27T04:23:06+5:30

मतिमंद बालक ही समाजाची समस्या आहे. त्यामुळे या समस्येवर उपाय शोधून काढणे ही समाजाची जबाबदारी आहे.

The problem of mentally challenged is social responsibility | मतिमंदांच्या समस्या ही सामाजिक जबाबदारी

मतिमंदांच्या समस्या ही सामाजिक जबाबदारी

googlenewsNext

नागपूर : मतिमंद बालक ही समाजाची समस्या आहे. त्यामुळे या समस्येवर उपाय शोधून काढणे ही समाजाची जबाबदारी आहे. काहीही दोष नसताना उपेक्षितांचे जगणे मतिमंदांच्या नशिबी येत असल्यामुळे समाजाने त्याचा विचार करून मतिमंदांना स्वीकारण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी आज येथे केले.
स्वीकार मतिमंद, स्वमग्न, सी. पी. व बहुविकलांग मुलांच्या पालकांच्या संस्थेतर्फे आठव्या जागृती विशेषांकाचे विमोचन बजाजनगरातील जानकी सभागृहात करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून नेत्रतज्ज्ञ डॉ. मुकुंद ओक, नीरीचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. चलपतीराव, स्वीकारच्या उपाध्यक्ष आणि जागृती विशेषांकाच्या संपादिका चित्रा कामथ, स्वीकारचे अध्यक्ष गोपाळ बोबडे, सुधाकर झाडगावकर, र. ग. गोखले उपस्थित होते. स्वीकारच्या उपाध्यक्ष चित्रा कामथ यांनी जागृती विशेषांकाबद्दल माहिती दिली. अंकात मतिमंदांचे लेख असून अपंगांबद्दल समाजाचे गैरसमज दूर करणे, त्यांच्या समस्यांची माहिती समाजाला देणे हे या अंकाचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. र. ग. गोखले म्हणाले, मतिमंद मुलांना त्यांचे हक्क मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी कायद्यात बदल होत आहेत. राईट आॅफ डिसअ‍ॅबिलीटी पर्सन अ‍ॅक्ट २०१६ मध्ये पारित होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मिहानमधील १० ते १५ उद्योगात मतिमंदांना रोजगार मिळणार असून मतिमंदांना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष तरतूद करून ४५ संस्थांना परवानगी देण्यात आली आहे. प्रशिक्षणादरम्यान एक हजार रुपये महिना आणि येण्याजाण्याच्या खर्चापोटी १५०० रुपये मतिमंदांना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. गोपाळ बोबडे म्हणाले, मतिमंद मुलांना सर्वसामान्यांसारखे जीवन जगता यावे यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. डॉ. सी. व्ही. चलपतीराव यांनी मतिमंदांविषयी समाजाचा दृष्टिकोन बदलविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. डॉ. मुकुंद ओक म्हणाले, मतिमंदांविषयी हळुहळु सामाजिक बांधिलकी विकसित होत आहे. स्वीकारच्या माध्यमातून ही भावना जागृत होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात जागृती विशेषांकाचे टंकलेखन करणाऱ्या चैतन्न बल्लाळ आणि आदित्य दामले या मतिमंद मुलांचा सत्कार करण्यता आला. संचालन मीनाक्षी दामले यांनी केले. आभार आनंद फडके यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: The problem of mentally challenged is social responsibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.