Private driver killed in Nagpur: Body dumped near railway line | नागपुरात खासगी वाहन चालकाची हत्या : मृतदेह रेल्वे लाईनजवळ फेकला

नागपुरात खासगी वाहन चालकाची हत्या : मृतदेह रेल्वे लाईनजवळ फेकला

ठळक मुद्देलकडगंज पोलिसात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खासगी वाहन चालविणाऱ्या एका तरुणाची अज्ञात आरोपींनी गळा आवळून हत्या केली. त्याचा मृतदेह लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मालधक्क्याजवळ (रेल्वे लाईननजीक) आढळला. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
धीरज भगवान सारवे (वय ३०) असे मृताचे नाव आहे. मृत धीरज वरंभा मौदा येथील रहिवासी होता. सहा महिन्यापूर्वीच त्याचा प्रेमविवाह झाला होता. तो खासगी वाहन चालवायचा. लॉकडाऊननंतर गावात रोजगार मिळेनासा झाल्याने तो नागपुरातील गरोबा मैदान परिसरात पत्नीसह राहायला आला होता. त्याचा एक भाऊ दिघोरीत तर मावशीचा परिवार शांतिनगर इतवारीत वास्तव्याला आहे. रविवारी रात्री ७.३० वाजेपर्यंत तो घरी होता. त्यानंतर बाहेर गेला. रात्र झाली तरी तो परतला नाही. त्यामुळे पत्नीने धीरजच्या भावाला ही माहिती दिली. इकडे शोधाशोध सुरू असतानाच धीरजचा मृतदेह लकडगंजमधील मालधक्क्याजवळ सोमवारी सकाळी आढळला. त्याच्या गळ्यावर दोरीने आवळल्याचे निशाण होते. त्याच्या पायालाही जखम होती मारेकº­यांनी धीरजला भूलथापा देऊन घटनास्थळी आणले असावे, त्याची हत्या करून मृतदेह रेल्वे रुळाजवळ फेकून आरोपी पळून गेले असावे, असा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. दरम्यान, रेल्वे रुळाजवळ मृतदेह पडून असल्याचे कळल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ते घटनास्थळ लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे लकडगंज पोलिसांना ही माहिती देण्यात आली. ठाणेदार नरेंद्र हिवरे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे पोहोचले. पंचनामा केल्यानंतर मृतदेह मेयो इस्पितळात पाठविण्यात आला. त्याच्याजवळ ओळखपत्र किंवा कोणतेही कागदपत्र नव्हते. त्यामुळे पोलिसांनी धीरजचे छायाचित्र काढून ते पोलिसांच्या ग्रुपवर व्हायरल केले. त्यावरून धीरज शांतिनगर इतवारी रेल्वेस्थानक परिसरात नेहमी येत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्याची ओळख पटली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांशी संपर्क केला.
रात्री ७ वाजता तो घरून निघून गेल्याची माहिती त्याच्या पत्नीने पोलिसांना दिली. अवघ्या सहा महिन्यापूर्वी प्रेमविवाह करून संसार थाटणाºया धीरजची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे आणि कुणी केली ते रात्रीपर्यंत स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, लकडगंज पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

मोटरसायकल, मोबाईल लंपास
धीरज घरून जाताना त्याच्या पल्सर मोटरसायकलवर गेला. त्याच्याजवळ मोबाईलही होता. या दोन्ही वस्तू
घटनास्थळी नव्हत्या. त्यामुळे मारेकऱ्यांनी त्या लांबविल्या असाव्यात, असा कयास आहे. ही बाब पोलिसांच्या पथ्यावर पडणार असून आरोपींना शोधून काढणे पोलिसांना सहज शक्य होणार आहे.

पाच दिवसापूर्वीची खुन्नस?
यात प्रकरणाला पाच दिवसापूर्वीची खुन्नस कारणीभूत असल्याचा पोलिसांना संशय आहे. मृत धीरज याचा त्याच्या गावातील शुभम आणि हर्ष नामक तरुणासोबत २६ मे रोजी वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले होते. धीरजने त्याच्या दोन चुलत भावाच्या मदतीने शुभम, हर्ष आणि त्याच्या साथीदारांची धुलाई केली होती. याप्रकरणी धीरजविरुद्ध मौदा पोलीस ठाण्यात कलम ३२४ अन्वये गुन्हाही दाखल झाला होता. हा वाद धीरजच्या हत्येमागे आहे का, ते शोधून काढण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने धीरजच्या गावातून चार ते पाच संशयित तरुणांना ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्यांची चौकशी सुरू होती.

Web Title: Private driver killed in Nagpur: Body dumped near railway line

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.