खासगी डॉक्टरांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा उपयोग आवश्यकतेनुसारच करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:07 IST2021-04-12T04:07:31+5:302021-04-12T04:07:31+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने खासगी डॉक्टरांनी या इंजेक्शन्सचा उपयोग इ व एफ ...

Private doctors should use Remedesivir injection as needed | खासगी डॉक्टरांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा उपयोग आवश्यकतेनुसारच करावा

खासगी डॉक्टरांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा उपयोग आवश्यकतेनुसारच करावा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा असल्याने खासगी डॉक्टरांनी या इंजेक्शन्सचा उपयोग इ व एफ गटातील रुग्णांसाठी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.

या संदर्भात रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त आवाहन जाहीर करताना जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, जिल्हा पारिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अर्चना कोठारी, डॉ. राजेश सावरबांधे, डॉ.अनुप मराज, डॉ. नंदू कोलवाडकर, डॉ. समीर चौधरी उपस्थित होते.

राज्यस्तरावरील टास्क फोर्स समितीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांवरील उपचारादरम्यान २३ मार्च रोजीच्या पत्रात शिफारस केल्यानुसार सर्व रुग्णांवर उपचार करणे बंधनकारक आहे. मात्र रेमडेसिवीर इंजेक्शनचा उपयोग फक्त इ व एफ गटातील रुग्णांसाठीच करण्याचे निर्देशित केले आहे. इ गटातील रुग्णांवर मध्यम स्वरूपाची लक्षणे असल्यास पाच दिवस आणि व्हेंटिलेटरवर रुग्ण असल्यास नऊ दिवस या इंजेक्शनचा उपयोग करावा. तर ग्रुप एफमध्ये पाच दिवस आणि रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्यास नऊ दिवस या इंजेक्शनचा उपयोग करावा.

चौकट

काय आहे इ व एफ गट

रुग्णांच्या लक्षणावरून या दोन गटात त्यांचे वर्गीकरण केले आहे. इ गटातील रुग्णांमध्ये श्वसन संस्था बंद पडणे, श्वास प्रश्वास हे एका मिनिटात २४ पेक्षा जास्त असणे, spo2 ची पातळी ९४ पेक्षा कमी असणे, pao2 ची पातळी ६० पेक्षा कमी असणे अशा रुग्णांचा समावेश आहे. तर एफ गटातील रुग्णांमध्ये श्वसन संस्था बंद पडण्यासह अन्य अवयवसंस्था निकामी होणे या लक्षणांचा समावेश होतो.

वापर करताना दक्षता घ्या

या दोन गटातील रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करण्याची दक्षता वैद्यकीय तज्ज्ञांनी घ्यावी. इतर प्रकारे इंजेक्शनचा वापर झाल्यास त्याची गंभीर दखल घेतली जाईल, रेमडेसिवीर इंजेक्शनच्याबाबत सर्वसामान्य जनतेला माहिती मिळाल्यामुळे जनतेमध्ये अशी भ्रामक कल्पना झाली आहे. की, ज्याला त्याची आवश्यकता नाही, असे रुग्णसुध्दा रेमडेसिवीर इंजेक्शनचा आग्रह करायला लागले आहे. म्हणून ज्या रुग्णाला रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे त्यांनाच डॉक्टरांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करायला सांगायचे असेही जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले. कोरोनाला नागपूर जिल्ह्यातून हद्दपार करायचं आहे त्यामुळे रेमडेसिवीर इंजेक्शन हे एक अस्त्र आहे पण त्याचा उपयोग बरोबर करायला हवा. सध्यास्थितीत जो प्रकार चालू आहे. त्याकरिता डॉक्टरांनी याबाबत जागृत राहावे, असेही त्यांनी सांगितले.

डॉक्टरांच्या संघटनेनेही केले आवाहन

यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी म्हणाल्या की, रुग्णांनी डॉक्टरावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितलेल्या मार्गदर्शनानुसार रेमडेसिवीर इंजेक्शनचा गरज असेल तिथेचा वापर करावा. जेणेकरुन ज्या रुग्णाला खरोखरचं रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे त्यांना उपलब्ध करुन देता येईल. विदर्भ हॉस्पिटल अशोसिएसनचे डॉ. अनुज मराज म्हणाले की, आवश्यकता नसेल तरी जबरदस्तीने रेमडेसिवीर इंजेक्शन घेतल्यास हे शरीरासाठी हानिकारक आहे. म्हणून ज्यांना या रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता आहे, त्यांनीच घ्यायला हवे.

Web Title: Private doctors should use Remedesivir injection as needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.