लसीकरणात शासकीय तुलनेत खासगी केंद्र पुढे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:09 IST2021-02-09T04:09:45+5:302021-02-09T04:09:45+5:30
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात करोना आणीबाणीच्या काळात फ्रंटवर लढलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जात असले तरी ...

लसीकरणात शासकीय तुलनेत खासगी केंद्र पुढे
नागपूर : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात करोना आणीबाणीच्या काळात फ्रंटवर लढलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जात असले तरी त्यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, सात शासकीय रुग्णालयातील केंद्राच्या तुलनेत खासगी रुग्णालयातील केंद्रावर अधिक प्रमाणात लसीकरण होत असल्याचे दिसून येत आहे. शहरात आज पुन्हा ५० टक्क्याच्या खाली लसीकरण झाले. कोविशिल्डचे ४९.८८ टक्के तर कोव्हॅक्सिनचे ४९.५० टक्के लसीकरण झाले.
शहरात कोविशिल्डचे २१ तर कोव्हॅक्सिनचे २ केंद्र आहेत. यातील मेडिकलमधील दोन, मेयोमधील दोन, एम्स, डागा, मनपाचे आयसोलेशन हॉस्पिटल, विमा दवाखाना, मनपाचे इंदिरा गांधी रुग्णालय व पोलीस हॉस्पिटल असे १० केंद्र आहेत. यातील पोलीस हॉस्पिटल सोडल्यास इतर केंद्रावर दिलेल्या लक्ष्यापैकी आज ९ टक्क्यापासून ते ५० टक्क्यापर्यंत लसीकरण झाले. याउलट ११ खासगी केंद्रावर २० ते ८९ टक्क्यापर्यंत लसीकरण झाले. सूत्रानुसार, खासगी केंद्रावर खासगी हॉस्पिटल जुळलेले आहेत. यातच अनेक हॉस्पिटलने हॉस्पिटलशी संबंध नसलेल्या परंतु ओळखीच्या व्यक्तींना हॉस्पिटलचे कर्मचारी दाखवून त्यांना लस देत आहे. यामुळे त्यांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे.
-मेयो व एम्समध्ये ९ टक्केच लसीकरण
कोविशिल्ड लसीकरणासाठी २१ केंद्र मिळून सोमवारी १७०० लाभार्थ्यांचे लक्ष्य देण्यात आले होते. यातील ८४८ म्हणजे, ४९.८८ टक्केच लसीकरण झाले. विशेष म्हणजे, मेयो व एम्समध्ये केवळ ९ टक्केच लसीकरण झाले. शिवाय, डागामध्ये ४३ टक्के, पीएमएच हॉस्पिटलमध्ये ८५ टक्के, आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये ६६ टक्के, ऑरेंज सिटी हॉस्पिटलमध्ये ७० टक्के, सीम्स हॉस्पिटलमध्ये २० टक्के, दंदे हॉस्पिटलमध्ये ८९ टक्के, वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये ५९ टक्के, विमा दवाखान्यामध्ये ५० टक्के, भवानी हॉस्पिटलमध्ये ११ टक्के, किंग्जवे हॉस्पिटलमध्ये ६२ टक्के, अॅलेक्सिस हॉस्पिटलमध्ये ३९ टक्के, म्यूर मेमोरियल हॉस्पिटलमध्ये २० टक्के, मनपाचा इंदिरा गांधी रुग्णालयात ३४ तर पोलीस हॉस्पिटलमध्ये १४७ टक्के लसीकरण झाले.
-मेडिकलमध्ये ४९ टक्के लसीकरण
मेडिकलमध्ये कोव्हॅक्सिन लसीकरणाचे दोन केंद्र आहेत. आज या दोन्ही केंद्राला मिळून २०० लाभार्थ्यांचे लसीकरणाचे लक्ष्य देण्यात आले होते. त्यापैकी ९९ म्हणजे ४९.५० टक्केच लाभार्थ्यांनी लस घेतली. मेडिकलला आतापर्यंत २६०० लाभार्थ्यांना लस देण्याचे लक्ष्य दिले होते. त्यापैकी १३०३ म्हणजे, ५०.१२ टक्के लसीकरण झाले.